शिक्षक भरतीतील पात्र उमेदवारांच्या मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 12:22 PM2019-08-09T12:22:42+5:302019-08-09T12:22:47+5:30
शिक्षण संस्था चालकांची बैठक घेऊन १९ ते ३0 आॅगस्टदरम्यान पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यास सांगण्यात आले आहे.
- नितीन गव्हाळे
अकोला: शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना अखेर दिलासा मिळाला असून, शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, ७ आॅगस्ट रोजी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीमध्ये शिक्षक भरतीच्या मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शिक्षण संस्था चालकांची बैठक घेऊन १९ ते ३0 आॅगस्टदरम्यान पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यास सांगण्यात आले आहे.
अनेक महिन्यांपासून शिक्षक भरती होईल की नाही, याविषयी तर्क-वितर्क लढविण्यात येत होते. पात्र उमेदवारांकडून शिक्षक भरतीबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. अखेर या चर्चेला आता विराम मिळणार असून, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीसाठी नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांच्या मुलाखती आता लवकरच होणार आहेत. ७ आॅगस्ट रोजी राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या उपस्थितीत राज्यभरातील सर्वच माध्यमिक शिक्षणाधिकाºयांच्या झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये शिक्षक भरतीच्या मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. शिक्षण संस्थाद्वारा संचालित शाळांतील पवित्र पोर्टलवर दिलेल्या जाहिरातीनुसार रिक्त असलेली पदे भरण्यासाठी उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात येणार आहे. निवड समिती, शाळा समितीद्वारा महाराष्ट्र खासगी शाळांमधील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील तरतुदीनुसार आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार उमेदवारांचे १/१0 प्रमाण असल्याने मुलाखतीचे नियोजन करण्यात येणार आहे. सोबतच वर्ग अध्यापन, मुलाखतीबाबत दस्तऐवज तयार करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. १९ ते ३0 आॅगस्टदरम्यान पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी संस्था लॉगिनवर
पवित्र प्रणालीनुसार ज्या शिक्षण संस्थांनी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, अशा संस्थांना ९ आॅगस्ट रोजी मुलाखतीशिवाय शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी संस्थांच्या लॉगिनवर उपलब्ध होणार आहे. १६ आॅगस्ट रोजी (मुलाखतीद्वारे) निवड करावयासाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी संस्था लॉगिनवर उपलब्ध होणार आहे.
संस्थांनी पात्र उमेदवारांना माहिती द्यावी!
शिक्षण संस्थांनी पात्र उमेदवारांना मुलाखतीचे ठिकाण, पत्ता, अध्यक्ष, सचिव यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करावेत आणि मुलाखतीच्या वेळी उमेदवारांना बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचेही निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.
४७ रिक्त पदांसाठी मुलाखती
जिल्ह्यात विविध शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांची ४७ रिक्त पदे आहेत. या रिक्त पदांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांची निवड करण्यात येणार आहे.
१९ ते ३0 आॅगस्टदरम्यान पात्र उमेदवारांच्या संबंधित संस्थांमध्ये मुलाखती घेण्यात येतील. त्यापूर्वी शिक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून शिक्षण संस्थांनी राबविण्याच्या कार्यपद्धतीबाबत एक बैठक लवकरच बोलाविण्यात येणार आहे. त्यामध्ये संस्थेचे नाव, रिक्त पदे, मुलाखतीचे ठिकाण, उमेदवारांचे कागदपत्रे तपासणीचे ठिकाण, समन्वय अधिकाऱ्यांचे नाव आदी माहिती सादर करावी लागणार आहे.
-प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी माध्यमिक.