८५७ उपवरांनी दिला परिचय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2017 01:18 AM2017-01-16T01:18:31+5:302017-01-16T01:18:31+5:30
शेगाव येथे माळी समाजाच्या राज्यस्तरीय संमेलन.
शेगाव, दि. १५ : येथे आयोजित माळी समाज राज्यस्तरीय उपवर युवक-युवती परिचय संमेलनात रविवारी दुसर्या दिवशी ८५७ उपवर युवक-युवतींनी आपला परिचय दिला. या संमेलनाच्या अनुषंगाने समाजबांधवांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.
माळी सेवा मंडळ खामगाव, शेगाव व युगपुरुष बहूद्देशीय प्रतिष्ठान अकोला यांच्यावतीने २३ वे माळी समाज राज्यस्तरीय परिचय संमेलनाचे आयोजन येथे करण्यात आले आहे. दरम्यान, या संमेलनाच्या दुसर्या दिवशीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन कमल तायडे यांनी केले, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. लक्ष्मणराव तायडे, उद्योजक मनोज महाजन, शंकरराव क्षीरसागर, डी.एस. खंडारे आदी ज्योतिपीठावर उपस्थितीत होते.
मुला-मुलींचा रंग न पाहता त्यांचे गुण पाहा व फुले विचारांशी जुळलेला असेल तरच लग्न करा, म्हणजे जीवनात सौख्य व सुख मिळेल, असे विचार कमल तायडे यांनी व्यक्त केले. तसेच इतर मान्यवरांनीही समयोचित विचार व्यक्त केले. संचालन अजय तायडे, तर आभार अनिल गिर्हे यांनी मानले.
'सोयर'च्या माध्यमातून जुळल्या रेशीमगाठी!
या मेळाव्यात राहुल सदानंद खंडारे तसेच दिशा खंडारे यांचा विवाह जुळला. याबद्दल त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच अन्नदाते यांचाही सत्कार पहिल्या सत्रात करण्यात आला. या मेळाव्यासाठी परिश्रम घेणारे माळी युवक संघटना सस्ती, पारस, लाखनवाडा आदींसह विविध मंडळाचे स्वागत करण्यात आले. तसेच कार्यकारिणी सदस्यांचेही स्वागत करण्यात आले आहे.
माळी समाजाच्या कार्यास सदैव सहकार्य- फुंडकर
माळी समाज सभागृहासाठी १५ लाख रुपयांचा निधी दिला असून, आ. आकाश फुंडकर यांच्या निधीतूनही १0 लाख रुपयांचा निधी दिला जाईल, तसेच ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून वंचित घटकाला न्याय देता येईल, अशी ग्वाही यावेळी ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी दिली. तसेच यावेळी आ.अँड. आकाश फुंडकर, आ. बळीराम सिरस्कार यांनीही मार्गदर्शन केले. त्यानंतर आ. चैनसुख संचेती यांच्यासह इतर मान्यवरांनीही या संमेलनास भेट दिली. या मान्यवरांचा आयोजकांकडून सत्कार करण्यात आला.