‘पिंजर येथील विकासकामांची चौकशी करा!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:17 AM2021-05-16T04:17:29+5:302021-05-16T04:17:29+5:30
निहिदा : येथून जवळच असलेल्या पिंजर येथे ऑक्टोबर २०१९ ते मे २०२१ पर्यंत झालेल्या विकासकामांच्या निधीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ...
निहिदा : येथून जवळच असलेल्या पिंजर येथे ऑक्टोबर २०१९ ते मे २०२१ पर्यंत झालेल्या विकासकामांच्या निधीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत या सर्व कामांची चौकशी करून दोषिंविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य विजया गावंडे यांनी बीडीओंकडे दिलेल्या तक्रारीतून केली आहे.
ग्रामपंचायत सदस्य विजया गावंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पिंजर ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक आर. पी. थोरात हे ऑक्टोबर २०१९ ते मे २०२१ या कालावधीत कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात १४ वा वित्त आयोग निधी यासह विविध निधीअंतर्गत अनेक कामे केली. ग्रामसेवक थोरात यांनी विकासकामे करीत असताना सदस्यांना विश्वासात घेतले नसून, गावात मनमानी करून कामे केली असल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. ग्रामसेवक या पदाचा दुरुपयोग करून गावात शासकीय अंदाजपत्रकाप्रमाणे काम न करता अनियमित काम केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत अंतर्गत केलेल्या कामांची चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी बीडीओंकडे दिलेल्या तक्रारीतून केली आहे.
--------------------
ग्रा.पं. सदस्याची तक्रार प्राप्त झाली असून, या प्रकरणात चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल.
-किशोर काळबांडे, बीडीओ, पं. स. बार्शीटाकळी.