भाड्याने घेतलेल्या कार वापराची चौकशी करा; सात दिवसात अहवाल सादर करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:51 AM2021-02-20T04:51:32+5:302021-02-20T04:51:32+5:30
अकोला: जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागासाठी भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या इनोव्हा कारचा मुद्दा पुन्हा जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत ...
अकोला: जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागासाठी भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या इनोव्हा कारचा मुद्दा पुन्हा जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत गुरुवारी गाजला. प्रशासनामार्फत भाड्याने घेण्यात आलेल्या इनोव्हा कार वापराची अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (एसीइओ) चौकशी करुन सात दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश अध्यक्षांनी सभेत दिले.
जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागासाठी भाडेतत्वावर कार घेण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यासाठी बोलेरो गाडी पाहिजे म्हणून जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली होती; परंतु बोलेरो ऐवजी इनोव्हा कार भाडेतत्वावर कशी घेण्यात आली, तसेच या कारचा वापर कोण करते, अशी विचारणा करीत, यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी सदस्य गोपाल दातकर यांनी सभेत लावून धरली. त्यानुषंगाने भाड्याने घेण्यात आलेली इनाेव्हा कार आणि कार वापराची जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी करून , सात दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्षांनी सभेत दिले. ग्रामीण पाणी पुरवठा विभागासाठी भाड्याने घेण्यात आलेल्या कार वापराचा मुद्दा जिल्हा परिषद स्थायी समितीच्या मागील सभेतही चांगलाच गाजला होता, हे विशेष. मागील सभेचे इतिवृत्त या सभेत मंजूर करण्यात आले, तसेच आरोग्य विभागासह अन्य विभागांच्या प्रलंबित देयकांच्या मुद्दयांसह विविध मुद्यांवर सभेत चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी सौरभ कटियार, उपाध्यक्ष सावित्री राठोड, शिक्षण व बांधकाम सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ, समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, महिला व बालकल्याण सभापती मनिषा बोर्डे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुभाष पवार, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर सुलताने, गोपाल दातकर, प्रशांत अढाऊ, चंद्रशेखर चिंचोळकर, गजानन पुंडकर यांच्यासह संबंंधित अधिकारी उपस्थित होते.