आर्थिक गुन्हे शाखेकडून १२ प्रकरणांचा तपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:19 AM2021-01-20T04:19:16+5:302021-01-20T04:19:16+5:30
अकाेला : आर्थिक गुन्हे शाखेमध्ये आता १२ प्रकरणांचा तपास सुरू असतानाच मुंबइ उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यामधील ८ प्रकरणांचा ...
अकाेला : आर्थिक गुन्हे शाखेमध्ये आता १२ प्रकरणांचा तपास सुरू असतानाच मुंबइ उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यामधील ८ प्रकरणांचा तपास करण्यास स्थगिती दिली आहे. त्यामुळे सध्यातरी आर्थिक गुन्हे शाखा ४ प्रकरणांचा तपास करीत आहे.
शहरासह जिल्ह्यात फसवणुकीच्या प्रकरणांचा तपास करून आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हे दाखल करण्यात येतात. यामध्ये अकाेला जिल्ह्यात गाजलेल्या श्रीसुर्या तसेच लासलगाव येथील एका सहकारी पतसंस्थेच्या घाेटाळ्याचा तपास गाजलेला आहे. या दाेन माेठ्या प्रकरणांसह आणखी १० आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत असतानाच आराेपींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. त्यामुळे ८ प्रकरणात न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आर्थिक गुन्हे शाखा आता आणखी काही प्रकरणांचा तपास करीत आहे. मात्र, त्यामध्ये पाहीजे त्या प्रकरणात गती नसल्याची माहिती आहे. बहुतांश प्रकरणात स्थगिती असल्याने पाेलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांकडे आता वेगळ्या अर्थाने पाहिले जात असल्याची माहिती आहे, तर डाबकी राेडवरील एका ट्रान्सपाेर्ट व्यावसायिकाने ५० लाखांच्या फसवणूक प्रकरणातही गुन्हा दाखल केल्यानंतर आराेपीस अटक करण्यात आली हाेती. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणात तपास करण्यास स्थगिती दिली आहे. त्यामुळे बहुतांश प्रकरणात आता स्थगिती असल्याने आर्थिक गुन्हे शाखेचे कामकाज सध्या तरी थांबलेले असल्याचे चित्र आहे.
गाजलेला घाेटाळा
अकाेल्यातच नव्हे; तर राज्यभर गाजलेल्या श्री सुर्या घाेटाळा प्रकरणात अकाेल्यातही खदान आणि रामदास पेठ पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. मात्र, सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली असून, त्यामुळे या प्रकरणाच्या तपासालाही खीळ बसली आहे. श्री सुर्यासाेबतच आणखी काही घाेटाळे अकाेल्यात गाजले आहेत.
संस्थांमध्ये अपहार अधिक
बीएचआर, लासलगाव येथील असलेल्या पतसंस्थेच्या अकाेला शाखेतही अपहार झाल्याचे समाेर आले आहे. यासाेबतच श्री सुर्या आणि एका माेठ्या बँकेच्या अधिकाऱ्यांची चाैकशी करण्यात आली हाेती. त्यामुळे संस्थांमधील अपहार जास्त प्रमाणात असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात समाेर आले आहे.
काेट
आर्थिक गुन्हे शाखेकडून फसवणुकीच्या प्रकरणांचा तपास सुरू आहे. मात्र, बहुतांश प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आर्थिक गुन्हे शाखा प्रकरणांचा तपास करीत आहे.
जी. श्रीधर
पाेलीस अधीक्षक, अकाेला