क्रीडा संकुलांच्या बांधकामांची चौकशी
By admin | Published: July 31, 2015 01:55 AM2015-07-31T01:55:59+5:302015-07-31T01:55:59+5:30
अकोला जिल्हाधिका-यांचा जिल्हा क्रीडा अधिका-यांना आदेश.
अकोला: जिल्ह्यातील 'तालुका क्रीडा संकुलांचा खेळखंडोबा' या 'लोकमत'ने सुरू केलेल्या वृत्तमालिकेची गंभीर दखल घेत, तालुका क्रीडा संकुलांच्या बांधकामांची चौकशी करून, बांधकामातील गैरप्रकाराला जबाबदार असणार्यांचा अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गुरुवारी जिल्हा क्रीडा अधिकार्याला दिला. तालुका क्रीडा संकुलांच्या बांधकामातील गैरप्रकाराला जबाबदार असणार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून, कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेतही जिल्हाधिकार्यांनी दिले. राज्य क्रीडा क्षेत्रात अग्रगण्य व्हावे, नागरिकांनी व्यायाम, खेळाची आवड जोपासावी आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दज्रेदार कामगिरी बजावणारे खेळाडू निर्माण करण्यासाठी तालुका स्तरावर क्रीडा संकुल उभारण्याची योजना शासनामार्फत राबविली जात आहे. २६ मार्च २00३ च्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील सात तालुक्यापैकी आकोट, मूर्तिजापूर, बाश्रीटाकळी, तेल्हारा व पातूर इत्यादी पाच तालुका स्तरावर तालुका क्रीडा संकुल उभारणीच्या कामाला सन २00४-0५ पासून सुरुवात करण्यात आली. या पाच तालुका क्रीडा संकुलांच्या बांधकामांसाठी शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीतून २ कोटी ३५ लाखांचा निधी जून २0१५ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत वितरित करण्यात आला. त्यामध्ये आकोट आणि तेल्हारा येथील तालुका क्रीडा संकुलांच्या बांधकामांमध्ये बहूद्देशीय सभागृहसह (इनडोअर हॉल) इतर सुविधांच्या कामात प्रचंड अनोगोंदी झाली. इनडोअर हॉल व कार्यालय इमारतींचे बांधकाम निकृष्ट झाले आहे. यासंदर्भात खामगाव येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या तीन सदस्यीय पथकाकडून करण्यात आलेल्या तपासणीत दोन्ही क्रीडा संकुलांचे इनडोअर हॉल वापर करण्यास अयोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे या दोन्ही क्रीडा संकुलांच्या इमारतींचे बांधकाम उद्घाटनापूर्वीच नापास ठरल्याचे स्पष्ट झाले. तसेच दहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेली आकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर, बाश्रीटाकळी व पातूर येथील तालुका क्रीडा संकुलांची कामे अद्यापही पूर्ण करण्यात आली नाही. सन २0११ पासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आलेली तालुका क्रीडा संकुलांची कामे संथगतीने सुरू असल्याच्या स्थितीत अद्यापही अपूर्णच आहेत.