पोषण आहाराचा तांदूळ कमी देणाऱ्याची चौकशी
By admin | Published: April 21, 2017 01:53 AM2017-04-21T01:53:08+5:302017-04-21T01:53:08+5:30
संगनमताच्या काळ्याबाजारात सहभागी असलेल्यांनाच विचारणा
अकोला : शालेय पोषण आहार योजनेचा तांदूळ काळ््याबाजारात जाण्यासाठी काही शाळांचे मुख्याध्यापक, पुरवठादार, वाहतूकदारांचे संगनमत असताना बॅगमध्ये तांदूळ कमी प्रमाणात मिळतो का, याची चौकशी मुख्याध्यापकांकडेच सोपवण्यात आल्याने याप्रकरणी आता हसावे की रडावे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध वृत्ताची दखल घेत चौकशी सुरू झाल्याचे पोषण आहार विभागाच्या पत्रावरून स्पष्ट होत आहे.
शालेय पोषण आहारातील तांदळाचा मोठ्या प्रमाणात अपहार होण्याला विद्यार्थ्यांची हजेरी नोंदवहीत घेतली जाणारी नोंद कारणीभूत आहे. त्या बळावरच मुख्याध्यापक आणि कंत्राटदाराच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात तांदळाचा अपहार होत आहे. हा घोटाळा शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट यांनी दिलेल्या शाळा भेटीत पुढे आला.
बोरगाव मंजू येथील मराठी शाळा क्रमांक १, २, ३ या शाळांमध्ये शालेय पोषण आहाराची दैनंदिन नोंदवही सत्र सुरू झाल्यापासून भरण्यात आली नव्हती. सोबतच १० ते २६ मार्च २०१७ या काळात पोषण आहार देणे बंद होते. त्याचवेळी शालेय पोषण आहारासाठी विद्यार्थी उपस्थिती १६० दाखवण्यात आली. त्यापैकी केवळ ९९ विद्यार्थीच उपस्थित होते. त्यामुळे हजेरीमध्येही तफावत दिसून आली. १८ ते २४ मार्चदरम्यान साठा नसल्याने पोषण आहार बंद होता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्याने पोषण आहार विभागाने त्याबाबतचा अहवाल १६ एप्रिल रोजीच्या पत्रानुसार जिल्ह्यातील सर्वच शालेय पोषण आहार अधीक्षक, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांना मागविला आहे.