पॅनकार्ड क्लबच्या राज्यभरातील गुंतवणूकदारांचा १४ मार्च रोजी सेबीवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 01:14 PM2018-02-16T13:14:49+5:302018-02-16T13:17:05+5:30
अकोला : कोट्यवधींची गुंतवणूक करून फसगत झालेल्या राज्यभरातील गुंतवणूदारांचा मोर्चा १४ मार्च रोजी मुंबईच्या बांद्रे येथील सेबीच्या कार्यालयावर धडकणार आहे.
अकोला : कोट्यवधींची गुंतवणूक करून फसगत झालेल्या राज्यभरातील गुंतवणूदारांचा मोर्चा १४ मार्च रोजी मुंबईच्या बांद्रे येथील सेबीच्या कार्यालयावर धडकणार आहे. गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्याचे आदेश असतानाही रक्कम मिळत नसल्याने गुंतवणूकदार संतापले आहेत.
विदर्भ, महाराष्ट्रासह हजारो गुंतवणूकदारांकडून पॅनकार्ड क्लबने कोट्यवधींची गुंतवणूक केली होती. दरम्यान, कायदेशीर आक्षेप आल्याने कंपनीचे सर्व व्यवहार गोठविले होते. हजारो गुंतवणूकदारांची मोठी रक्कम अडकल्याने राज्यभरातून ओरड सुरू झाली. गुंतवणूकदारांनी राज्य पातळीवर आणि जिल्हा पातळीवर संघटना तयार करून लढा उभारला. राज्यात जवळपास २८ सभा घेतल्या गेल्यात. दरम्यान, न्यायालयाने पॅनकार्ड क्लबची संपूर्ण मालमत्ता जप्त करून गुंतवणूकदारांना देण्याचे निर्देश दिले. मुंबई, गोवा आणि राज्यातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांची मालमत्ता जप्तही करण्यात आली; मात्र अजूनही गुंतवणूकदारांना त्यांच्या रकमा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे राज्यभरातील पॅनकार्ड क्लबच्या गुंतवणूकदारांनी आता १४ मार्च रोजी मुंबई वांद्रे येथील सेबीच्या कार्यालयावर धडक देण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चाआधी सेबीने गुंतवणूकदारांची रक्कम दिली तर हा मोर्चा रद्द होऊ शकतो. आता १४ मार्चच्या आधी सेबी काय ठोस भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.