हायवेवरील लुटमारमध्ये तडीपार आरोपीचा सहभाग
By admin | Published: July 14, 2017 01:17 AM2017-07-14T01:17:49+5:302017-07-14T01:17:49+5:30
तडीपार केलेल्या हरिहरपेठेतील एका आरोपीचा राष्ट्रीय महामार्गावर लुटमारमध्ये सहभाग असल्याने समोर आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आठ महिन्यांसाठी तडीपार केलेल्या हरिहरपेठेतील एका आरोपीचा राष्ट्रीय महामार्गावर लुटमारमध्ये सहभाग असल्याने समोर आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी अटक केली. उमेश रामचंद्र धुर्वे असे आरोपीचे नाव असून, तडीपार केल्यानंतरही तो शहराच असल्याचे या घटनेमुळे समोर आले आहे.
राष्ट्रीय महामार्गावर रात्री प्रवास करणाऱ्या ट्रकचालकांना तसेच कारचालकांना अकोल्यातील एका टोळक्याने लुटमार सुरू केली होती. हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरू होता. एका ट्रकचालकाला लुटल्यानंतर त्याने या प्रकाराची माहिती पोलीस कर्मचारी राजू सोळंके यांना सांगितली. त्यांनी रात्री जीवाची पर्वा न करता ट्रकचालकाने सांगितलेल्या वर्णनाच्या दुचाकीस्वारांचा पाठलाग करून यामधील राहुल विनोद सारवान (२५), रोहन कैलास डिकाव (२०), बलराम रामसिंग डिकाव (२०) रा. वाल्मीकी नगर अकोला, कुणाल मनोज निदाने (२५) शिवाजी नगर या चौघांना अटक केली. या ठिकाणावरून उमेश धुर्वे हा पसार झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनंतर त्यांनी गुरुवारी धुर्वेला हरिहर पेठेतून अटक केली. त्याची माहिती घेतली असता तो जिल्ह्यातून आठ महिन्यांसाठी तडीपार असल्याचे पोलीस तपासात समोर आले. तडीपार असतानाही त्याने ही लुटमार केली असल्याने पोलिसांचा वचक संपल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात डोईफोडे, शंकर डाबेराव, रामेश्वर सोनोने, संतोष गावंडे, अमित दुबे यांनी केली.
हायवेवरील लुटमारीमागे मोठी टोळी
हायवेवर ट्रक चालक आणि कारचालकांना लुटणाऱ्या टोळीमध्ये आणखी काहीजण असल्याची माहिती आहे. पोलिसांनी सखोल तपास केल्यास तसेच बँक खाते तपासल्यास या टोळीमागच्या चेहऱ्यांचा पर्दाफाश होईल. या टोळीला चालविणाऱ्यांचे कॉल डिटेल्स व इतर माहिती घेतल्यास अनेकांची नावे समोर येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.