लोखंडाच्या भावात सहाशे रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 12:10 PM2019-12-30T12:10:42+5:302019-12-30T12:10:47+5:30

३,४०० रुपये क्विंटल असलेले स्टील आठ दिवसांत ४,२०० रुपये झाल्याने बांधकाम व्यावसायिकांवर जबर परिणाम झाला आहे.

Iron prices rise by 600 Rs | लोखंडाच्या भावात सहाशे रुपयांची वाढ

लोखंडाच्या भावात सहाशे रुपयांची वाढ

googlenewsNext

- संजय खांडेकर 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : आठवड्याभरात स्टीलचे (लोखंड)भाव क्विंटलमागे सहाशे रुपयांनी उसळल्याने बाजारपेठ हादरली आहे. ३,४०० रुपये क्विंटल असलेले स्टील आठ दिवसांत ४,२०० रुपये झाल्याने बांधकाम व्यावसायिकांवर जबर परिणाम झाला आहे. त्यामुळे नव्याने इमारत बांधकाम करणाऱ्यांनी तूर्त बांधकाम थांबविले आहे. स्टीलचे भाव केव्हा खाली घसरतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्वस्त स्क्रप (भंगार) मोठ्या प्रमाणात भारतात दाखल झाल्याने, आॅगस्ट महिन्यात लोखंडाचे दर तब्बल २० टक्क्यांनी गडगडले होते. चीन,जपान आणि दुबई येथील स्क्रप (भंगार) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून थेट भारतात दाखल झाल्याने भाव घसरले होते. सहा हजार रुपये क्विंटलच्या भावाने विक्री होणारे लोखंड तेव्हापासून ३,३०० ते ३,६०० रुपयांवर येऊन थांबले. तेव्हापासून लोखंडात तेजी नव्हती.
दरम्यान, विदेशी स्क्रपची आयात बंद होताच लोखंडाचे भाव पुन्हा चढू लागले आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या चरणात पुन्हा लोखंडात तेजी आली अन् आठ दिवसांत लोखंडाचे भाव ३,४०० रुपयांवरून उसळून थेट ४,२०० वर जाऊन पोहोचले. ही भाववाढ आता पाच हजाराच्या पलिकडे जाण्याची शक्यतादेखील वर्तविली जात आहे. सर्वात जास्त लोखंडाची मागणी सळईच्या रूपाने इमारत बांधकामासाठी असते आणि देशाची आर्थिक नाडी इमारत बांधकामाच्या इंडस्ट्रीजवर अवलंबून आहे.
देश आणि विदेशातील स्क्रपमधूनच लोखंडाची निर्मिती होते. देशाची ही भूक रायपूर आणि जालना स्टील इंडस्ट्रीज भागवित असते. बांधकाम व्यावसायात आधीच मंदी आहे. त्यात लोखंडात भाववाढ होत असल्याने आर्थिक घडी पुन्हा विस्कळीत होण्याचे संकेत आहे.


बांधकाम व्यावसायिकांवर आधीच मंदीचे सावट आहे. त्यात लोखंडाचे भाव आठ दिवसात सहाशे रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसाय पुन्हा धोक्यात सापडला आहे. शासनाने यातून मार्ग काढण्याची वेळ आली आहे.
-दिनेश ढगे,
जिल्हाध्यक्ष क्रेडाई, अकोला.

 

Web Title: Iron prices rise by 600 Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.