समन्वित कृषी विकास प्रकल्पात एक कोटी ९२ लाखांची अनियमितता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 11:39 PM2017-12-21T23:39:10+5:302017-12-21T23:44:58+5:30
अकोला : आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीतून शेतकर्यांना पीक संवर्धन ते पणन व्यवस्थेपर्यंत लागणार्या गरजांसाठी दिल्या जाणार्या अनुदानाच्या योजनांत एक कोटी ९२ लाख रुपयांचा घोळ केल्याप्रकरणी समन्वित कृषी विकास प्रकल्पाचे तत्कालीन जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक सतीश रूपचंद गद्रे यांच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसांनी गुरुवारी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीतून शेतकर्यांना पीक संवर्धन ते पणन व्यवस्थेपर्यंत लागणार्या गरजांसाठी दिल्या जाणार्या अनुदानाच्या योजनांत एक कोटी ९२ लाख रुपयांचा घोळ केल्याप्रकरणी समन्वित कृषी विकास प्रकल्पाचे तत्कालीन जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक सतीश रूपचंद गद्रे यांच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसांनी गुरुवारी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. लेखापरीक्षणात सदर अनियमितता समोर आली आहे.
शेतकर्यांसाठी विविध योजना समन्वित कृषी विकास प्रकल्प कार्यालयातून राबवल्या जातात. त्यासाठी आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी खर्च केला जातो. शेतकर्यांना लाभाच्या योजना देताना शासनाने वस्तू खरेदीसाठी मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनांचे पालन न करता समन्वित कृषी विकास प्रकल्प कार्यालय अकोल्याचे तत्कालीन प्रकल्प व्यवस्थापक सतीश रूपचंद गद्रे यांनी २0१६-१७ मध्ये खरेदी प्रक्रिया केली. त्या प्रक्रियेत निधीचा मोठा गोंधळ झाल्याचे लेखापरीक्षण अहवालातून पुढे आले. ऑगस्ट २0१७ पर्यंतच्या खरेदी प्रक्रियेत एक कोटी ९२ लाख रुपयांचा घोळ झाला. कमी किमतीच्या वस्तू अधिक दराने खरेदी करण्यात आल्या. पुरवठादारांशी संगनमताने ही अनियमितता करण्यात आली आहे. त्यानंतर गद्रे ऑगस्ट २0१७ अखेरपर्यंत पदावर कार्यरत होते. त्या कार्यकाळातील आर्थिक खरेदी व्यवहारांची तपासणी करण्यात आली. त्यातही मोठी तफावत आढळून आली आहे. लेखापरीक्षणाचा अहवाल विभागीय आयुक्त तथा प्रकल्प संचालकांकडे सादर करण्यात आला. त्यामध्ये नियमबाह्य खर्च केलेली रक्कम गद्रे यांच्याकडून वसूल करण्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी दिला आहे. याप्रकरणी झालेल्या वित्तीय अनियमितता आणि नियमबाह्य खर्च केलेली रक्कम गद्रे यांच्याकडून वसूल करण्यासाठी पोलिसात तक्रार करण्याचा आदेश जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी दिल्यानंतर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुरुवारी अकोल्याचे प्रभारी प्रकल्प व्यवस्थापक शैलेश पाटील यांनी तक्रार दिली. यावरून पोलिसांनी सतीश रुपचंद गद्रे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४0९ नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.