मनपाच्या सायकल खरेदीत घोळ; सभापती अंधारात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 01:14 PM2020-08-08T13:14:19+5:302020-08-08T13:15:46+5:30
या संपूर्ण प्रकरणी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मनीषा भन्साली यांना अंधारात ठेवण्यात आल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खरेदी केल्या जाणाऱ्या सायकल प्रक्रियेत शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग तसेच मुख्याध्यापकांनी घोळ घातल्याचे समोर आले आहे. सायकल खरेदीबाबत मुख्याध्यापकांना कोणत्याही लेखी सूचना दिल्या नसल्याचे सांगत शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना, महिला व बालकल्याण अधिकारी नंदिनी दामोदर यांनी हात वर केले आहेत. याप्रकरणी मुख्याध्यापक अडचणीत सापडले असून, या संपूर्ण प्रकरणी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मनीषा भन्साली यांना अंधारात ठेवण्यात आल्याची माहिती आहे.
महापालिकेतील महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मनीषा रवींद्र भन्साली यांनी मनपा शाळेतील इयत्ता पाचवी, सहावी व सातवीमध्ये शिक्षण घेणाºया १ हजार ९४८ विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यासाठी ८७ लाख ६६ हजार रुपयांची तरतूद प्रस्तावित केली होती. या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेने मंजुरी दिल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविण्यात आला. समितीने हा प्रस्ताव स्थगित ठेवल्यानंतरही मनपा शाळेतील काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना सायकल खरेदीचे निर्देश दिले. खरेदी केलेल्या सायकलची पावती शिक्षण विभागामार्फत महिला व बालकल्याण विभागाकडे सादर केल्यावर सायकलचा आर्थिक मोबदला संबंधित विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाणार होता; परंतु स्थायी समितीने हा प्रस्ताव स्थगित ठेवल्यामुळे मुख्याध्यापक अडचणीत सापडले आहेत. दुसरीकडे महिला व बालकल्याण विभागाच्या पत्रानुसार मुख्याध्यापकांना सायकलसाठी पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. खरेदीबाबत कोणतीही सूचना दिली नव्हती, असे सांगत याप्रकरणी शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांनी कानाला हात लावले आहेत.
मुख्याध्यापकांनी सायकल खरेदीची प्रक्रिया विचारली असता त्यांना केवळ माहिती दिली. खरेदी करण्यासंदर्भात कोणत्याही लेखी अथवा मौखिक सूचना दिल्या नाहीत. मुख्याध्यापकांनी त्यांच्या स्तरावर परस्पर सायकल खरेदी प्रक्रिया केल्याचे दिसते.
- नंदिनी दामोदर,
प्रभारी महिला व बाल कल्याण अधिकारी, मनपा
मनपा शाळेतील काही गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांनी पदरचे पैसे खर्च करून सायकल खरेदी केल्याची माहिती मिळाली. या संपूर्ण प्रकरणाची प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषी आढळून येणाºया व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
- मनीषा भन्साली,
महिला व बाल कल्याण समिती सभापती