देगाव येथे रस्त्याच्या कामात अनियमितता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:21 AM2021-09-26T04:21:08+5:302021-09-26T04:21:08+5:30
वाडेगाव : येथून जवळच असलेल्या ग्रामपंचायत देगाव येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत केलेल्या कामात अनियमितता असल्याचा आरोप करीत ग्राम ...
वाडेगाव : येथून जवळच असलेल्या ग्रामपंचायत देगाव येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत केलेल्या कामात अनियमितता असल्याचा आरोप करीत ग्राम प्रशासनावर व संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी करीत ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीनुसार, सन २०२०-२१ दलित वस्ती रस्ता मंजूर झाला आहे. त्यानुसार संबंधित कंत्राटदाराने सरपंच, सचिव यांच्याशी संगनमत करून २०१८ साली केलेल्या कामावरच काम केले. ठरावानुसार दिलेल्या लोकेशनवर काम केले नाही, इस्टिमेटप्रमाणे लोखंड, सिमेंटचे प्रमाण वापरले नसून, थातूरमातूर काम केले आहे. या रस्त्याची पाहणी करून दोषींवर कारवाई करावी, संबंधित कंत्राटदारास ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे, अशी मागणी तक्रारीतून केली आहे. या तक्रारींवर ग्रामपंचायत सदस्य प्रिया दिलीप शेगोकार, ज्ञानेश्वर मसने, गीताबाई लढे, गणेश पवार, ईश्वर बोरकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
-------
कामामध्ये कोणताही गैरप्रकार झाला नसून, ठराव घेतलेल्या कामाप्रमाणे कामे केली गेली आहेत.
- राजेश जठाळे, ग्रामसचिव, देगाव.