घनकचरा निविदेच्या प्रक्रियेत अनियमितता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:17 AM2020-12-29T04:17:57+5:302020-12-29T04:17:57+5:30
बार्शिटाकळी : येथे नगरपंचायतीमधील घनकचरा निविदाप्रक्रियेत निवड कमिटीने आमिषाला बळी पडून अनियमितता केल्याची तक्रार मो.मुद्दसीर मो. जहीर यांनी मुख्यमंत्री ...
बार्शिटाकळी : येथे नगरपंचायतीमधील घनकचरा निविदाप्रक्रियेत निवड कमिटीने आमिषाला बळी पडून अनियमितता केल्याची तक्रार मो.मुद्दसीर मो. जहीर यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे दिले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करून तत्काळ दोषींवर कारवाई करण्याची मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे.
मो. मुद्दसीर मो. जहीर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बार्शिटाकळी नगरपंचायत कार्यक्षेत्रातील ओला-सुका घनकचरा संकलित करणे, वाहतूक करण्याची निविदा जाहीर करून प्रस्ताव मागविले होते. यासाठी आठ जणांनी प्रस्ताव सादर केले होते. दोन प्रस्ताव अपूर्ण असल्याने रद्द करण्यात आले होते. निविदा सादर करताना पाच किंवा कमीत कमी दोन वर्षांचा अनुभव असल्याचे दस्तावेज प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक होते; मात्र तसे न करता तांत्रिक निवड समिती आमिषाला बळी पडून निविदाधारकास मदत केल्याचा आरोप तक्रारकर्ते मो.मुद्दसीर यांनी केला आहे. त्यामुळे निवड समितीने केलेल्या निवडप्रक्रियेची सखोल चौकशी करून, दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे दिलेल्या तक्रारीतून करण्यात आली आहे.