सिंचन परिषद: पाणी वापर संस्थांच्या सक्षमीकरणासाठी प्रभावी नियोजनाची गरज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 10:54 AM2020-01-20T10:54:22+5:302020-01-20T10:54:35+5:30
आदर्श सिंचन व्यवस्थापनाकरिता पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रभावी नियोजनाची गरज आहे, असा सूर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कमिटी सभागृहात आयोजित महाराष्ट्र सिंचन परिषदेच्या आठव्या चर्चासत्रात रविवारी उमटला.
अकोला : आदर्श सिंचन व्यवस्थापनाकरिता पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रभावी नियोजनाची गरज आहे, असा सूर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कमिटी सभागृहात आयोजित महाराष्ट्र सिंचन परिषदेच्या आठव्या चर्चासत्रात रविवारी उमटला.
‘आदर्श सिंचन व्यवस्थापनासाठी पाणी वापर संस्थांचा सहभाग व सक्षमीकरण’ या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता एकनाथराव जोगदंड होते. या सत्रात दादाराव देशमुख, मनोज तायडे, अविनाश डुडूळ, विश्वंभर घोसीकर यांनी सहभाग घेत विचार मांडले. अपेक्षित लोकसहभाग मिळाला नसल्याने पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण कागदावरच राहिले असून, आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यानंतरच पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण होणार आहे. त्यासाठी पाटबंधारे विभाग आणि पाणी वापर संस्थांमध्ये सुसंवाद महत्त्वाचा असून, पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण करणे गरजेचे आहे, असे मत अविनाश डुडूळ यांनी व्यक्त केले. वातावरणातील बदल आणि परतीच्या पावसाने भरणारी धरणे यामुळे ओलिताचे नियोजन कोलमडत आहे. त्यामुळे पाणी वापर संस्था सक्षम होतील कशा, असा प्रश्न मनोज तायडे यांनी उपस्थित केला.
शेतकरी संकटात असल्याच्या परिस्थितीत पाणी व्यवस्थापनात शेतकऱ्यांच्या सहभागाची अपेक्षा करणे अयोग्य असून, शेती व्यवसाय दिवसेंदिवस तोट्याचा होत असताना पाणी व्यवस्थापनाचा मात्र ताळमेळ लावण्यात येत नाही. त्यामुळे पाणी वितरण प्रणालीची कामे तातडीने होणे आवश्यक असून, देखभाल-दुरुस्तीवर लक्ष देऊन, पाणी वापर संस्थांना सक्षम करण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याची गरज असल्याचे मनोज तायडे यांनी सांगितले. प्रत्येक लाभार्थी शेतकºयाच्या बांधापर्यंत पाणी पोहोचले पाहिजे. त्यासाठी पाणी वापर संस्थांच्या सक्षमीकरणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असे मत निवृत्त अभियंता विश्वंभर घोसीकर यांनी मांडले.
पिकांना पाणी देण्यासाठी बंदनलिका पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आल्या असून, शेतीतून उत्पन्न होणाºया शेतमालाचे मूल्यवर्धन करायचे आहे, असे दादाराव देशमुख यांनी सांगितले. पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून विविध प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत; मात्र प्रकल्प उभारणीसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पाणी वापर संस्थांना सक्षम करण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. पाणी व्यवस्थापनाची कामे पाणी वापर संस्थांकडे हस्तांतरित करण्याच्या प्रयत्नांना यश येत आहे. त्यामुळे पाणी वापर संस्था सक्षम होतील, अशी अपेक्षा एकनाथराव जोगदंड यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. (प्रतिनिधी)