पश्चिम वऱ्हाड तहानलेलाच; अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यांतील सिंचन प्रकल्प रितेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 02:21 PM2019-08-05T14:21:54+5:302019-08-05T14:22:34+5:30
अपेक्षित दमदार पाऊस झाला नसल्याने अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांतील बहुतांश सिंचन प्रकल्प रितेच आहेत.
अकोला : राज्यातील काही भागात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असली, तरी पश्चिम वऱ्हाड तील तीन जिल्हे तहानलेलेच आहेत. अद्याप अपेक्षित दमदार पाऊस झाला नसल्याने अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांतील बहुतांश सिंचन प्रकल्प रितेच आहेत.
वºहाडात यावर्षी २३ जून रोजी मान्सूनने प्रवेश केला. दोन दिवस पाऊस पडल्यानंतर चार आठवडे दडी मारली. २६ जुलै रोजी जेमतेम पावसाला सुरुवात झाली; परंतु पावसात जोर नव्हता. ३० जुलै रोजी बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यानंतर पाऊसच नाही. पाऊस आला तर काही मोजक्या भागात पडतो. ढग मात्र प्रचंड दाटून येतात; पण पाऊसच पडत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७९१ मि.मी. आहे; परंतु आजमितीस जिल्ह्यात ३८७.४ मि.मी. पाऊस झाला. या पावसाची गती मात्र तुरळक आहे. मागील चोवीस तासांत रविवार सकाळी ८.३० वाजतापर्यंत जिल्ह्यातील काही भागात पाऊस पडला असून, ३३.५ पावसाची नोंद झाली.
-बुलडाणा
बुलडाणा जिल्ह्यात रविवारी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडला. दरम्यान, आतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ५८.९३ टक्के पाऊस पडला आहे. यामध्ये संग्रामपूर तालुक्यात सर्वाधिक ८१.२१ टक्के तर बुलडाणा तुलक्यात ७६.६८ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
दुसरीकडे रविवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात २.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात पावसाने वार्षिक
सरासरीची ५० गाठली असली तरी जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये अद्यापही अपेक्षित जलसाठा झालेला नाही. तो होण्यासाठी जिल्ह्याला सार्वत्रिक व दमदार पावसाची गरज आहे.
-वाशिम
गत नऊ दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात बरसत असलेल्या पावसाने रविवार, ४ आॅगस्ट रोजी सकाळपासूनच विश्रांती घेतली. रविवारी पाऊस पडला नाही. गुरुवार, २५ जुलैपासून जिल्ह्यात कमी-अधिक स्वरूपात सार्वत्रिक पाऊस झाल्याने पिकांना संजीवनी मिळाली. रविवार, ४ आॅगस्ट रोजी सकाळपासूनच पावसाने विश्रांती घेतली. रात्री उशिरापर्यंत पाऊस झाला नाही. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७९८ मि.मी. आहे. तथापि, आजमितीस ३९७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.