जऊळका पोलिस स्टेशनला आयएसओ मानांकन
By admin | Published: March 18, 2017 03:23 PM2017-03-18T15:23:46+5:302017-03-18T15:23:46+5:30
मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे पोलिस स्टेशनला आयएसओ ३००१-२०१५ मानांकन प्राप्त झाले आहे.
जऊळका रेल्वे: मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे पोलिस स्टेशनला आयएसओ ३००१-२०१५ मानांकन प्राप्त झाले आहे. याबद्दल ठाणेदार आर. जी. शेख यांचा शुक्रवारी जिल्हा पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील सर्वच पोलिस स्टेशनला आयएसओचा दर्जा प्राप्त करून देण्याचा निर्धार पोलिस अधिक्षकांनी यावेळी व्यक्त केला.जाझ-एन्झ या आंतरराष्ट्रीय कंपनीने प्रतिनिधी प्रमोद पाटील व त्यांच्या चमूने जऊळका पोलिस स्टेशनच्या कामकाजाची पाहणी केली, तसेच जऊळका पोलिस स्टेशनचे सौंदर्यीकरण व जागोजागी लावलेले वृक्ष मनमोहीत करणारे असल्याचे त्यांना दिसले. त्याशिवाय विद्युत प्रकाशासाठी जागोजागी लावलेले दिवे आणि पोलिस स्टेशनच्या कार्यपद्धतीत झालेला बदल, गुन्ह्यात झालेली घट पाहता या पोलिस स्टेशनला आयएसओ मानांकन देण्यात आले. पोलिस स्टेशन अंतर्गत ४२ गावे येत असून, ठाणेदार शेख रुजू झाल्यापासून या परिसरात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहून गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे पोलिस अधिक्षक होळकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक स्वप्ना गोरे उपस्थित होते. पोलिस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांचीही यात मोलाची भूमिका असल्याचे मत पोलिस अधिक्षकांनी व्यक्त केले.