पाच पशुवैद्यक दवाखान्यांना ‘आयएसओ’ मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:40 PM2019-08-18T12:40:18+5:302019-08-18T12:40:32+5:30
पाच पशुवैद्यकीय दवाखान्यांना आयएसओ (आंतरराष्ट्रीय मानांकन संघटना) मानांकन देण्यात आले आहे.
अकोला: अकोला पंचायत समितीमधील पाच पशुवैद्यकीय दवाखान्यांना आयएसओ (आंतरराष्ट्रीय मानांकन संघटना) मानांकन देण्यात आले आहे. या दवाखान्यांमध्ये ‘आयएसओ’च्या नियमानुसार सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यातील २८ पशुवैद्यकीय दवाखाने ‘आयएसओ’ करण्याची तयारी सुरू आहे.
अकोला जिल्हा परिषद पशुसवंर्धन विभागाअंतर्गत ६८ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. या दवाखान्यांमध्ये अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपचार मिळावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे पशुवैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. आर. मिश्रा यांनी पहिल्या टप्प्यात २८ पशुवैद्यकीय दवाखाने ‘आयएसओ’ करण्याचा तयारी सुरू केली आहे. त्यापैकी अकोला पंचायत समितीमधील पाच दवाखान्यांना ‘आयएसओ’ मानांकन मिळाले आहे. त्यामध्ये घुसर, बोरगाव मंजू, भौरद, निंभोरा, कापशी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यांचा समावेश आहे.