जिल्हा पणन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा प्रश्न निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 01:40 PM2018-12-18T13:40:34+5:302018-12-18T13:40:58+5:30
कारंजाच्या सह निबंधकांकडे जिल्हा मार्केटिंग अधिकारी पदाचा प्रभार सोपविण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्हा वेगळा होवून २१ वर्षे झाले असतानाही या जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हा पणन अधिकारी नसल्याने सदर अधिकाºयाची नियुक्ती करण्याकरीता योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी बसपाचे राहुलदेव मनवर यांनी विभागीय आयुक्त महसूल, अमरावती यांना अमरावती येथे निवेदनाद्वारे केली होती. त्याची दखल घेऊन कारंजाच्या सह निबंधकांकडे जिल्हा मार्केटिंग अधिकारी पदाचा प्रभार सोपविण्यात आला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रासह जिल्ह्यातील शेतकरी नापिकीमुळे त्रस्त असल्याने सोयाबीन, ऊडीद, मुग, तुर, चना नाफेडमार्फत खरेदी केल्या जाते. या योजनेचा देखरेख आधिकारी जिल्हा मार्केटिंग अधिकारी असतो, मात्र वाशिम येथील खरेदी प्रक्रियेचा प्रभार अकोला येथील पणन अधिकाºयांकडे आहे. यामुळे नाफेडमार्फत शेतमाल खरेदी करण्यात अनेक अडचणी येतात. ही समस्या सोडविण्यासाठी वाशिम जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हा पणन अधिकाºयाची नियुक्ती करण्याची मागणी बहुजन समाज पक्षाचे राहुलदेव मनवर यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. त्यावर विभागीय आयुक्तांनी २६ नोव्हेंबर रोजी पणन विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवून वाशिम जिल्ह्यास तात्काळ स्वतंत्र पणन अधिकारी नियुक्त होणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणून दिले. या मागणीची दखल अपर निबंधक, सहकारी संस्था (प्रशासन) पुणे यांनी घेत वाशिमसाठी पणन अधिकारी म्हणून कारंजा येथील तालुका सह निबंधकांकडे तात्काळ प्रभार सोपविण्याच्या सुचना जिल्हा उपनिबंधकांना दिल्या आहेत.