बालवाड्यांच्या मुद्यावरून महापालिका द्विधा मन:स्थितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:44 PM2019-04-13T12:44:34+5:302019-04-13T12:44:40+5:30
अकोला: महापालिका शाळेतील बालवाड्या बंद करून त्याऐवजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाच्या अखत्यारित असलेल्या अंगणवाड्यांचे मनपा शाळांमध्ये स्थानांतरण करण्याचा बाल विकास विभागाच्या आयुक्तांचा प्रस्ताव कधीचाच हवेत विरला.
अकोला: महापालिका शाळेतील बालवाड्या बंद करून त्याऐवजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाच्या अखत्यारित असलेल्या अंगणवाड्यांचे मनपा शाळांमध्ये स्थानांतरण करण्याचा बाल विकास विभागाच्या आयुक्तांचा प्रस्ताव कधीचाच हवेत विरला. बाल विकास विभाग व मनपाच्या संयुक्तिक सर्व्हेनंतर मनपाच्या ३३ पैकी फक्त पाच शाळांमध्ये अंगणवाडी सुरू करता येणार होती. यामुळे मनपा प्रशासनाने बंद केलेले बालवाडीचे वर्ग यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून पुन्हा सुरू करण्याची गरज असताना या मुद्यावरून मनपा उपायुक्त विजयकुमार म्हसाळ द्विधा मन:स्थितीत सापडल्याची माहिती आहे.
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ होत नसल्याने मनपा शाळांवर समायोजनाची परिस्थिती ओढवली. गोरगरीब कुटुंबांना महागड्या कॉन्व्हेंटचा खर्च परवडणारा नसल्यामुळे मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी २०१७ मध्ये मनपाच्या ३३ शाळांमध्ये बालवाडीचे वर्ग सुरू केले. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी मानधन तत्त्वावर ३३ स्वयंसेविका व ३३ मदतनीस यांची पदभरतीद्वारे नियुक्ती केली. सेविकांना तीन हजार रुपये, तर मदतनीस यांना एक हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला होता. बालवाडीचे वर्ग सुरू होऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत नाही तोच एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या आयुक्तांनी मनपाने सुरू केलेली बालवाडी व शहरातील अंगणवाडीच्या संदर्भात भूमिका स्पष्ट केली. मनपाने शहरातील १७९ अंगणवाड्यांसाठी वर्गखोल्या उपलब्ध करून दिल्यास अंगणवाडीतील विद्यार्थी पुढील पहिल्या वर्गासाठी मनपा शाळेत प्रवेश घेऊ शकतील. यामुळे मनपा शाळांची पटसंख्या कायम राहण्यासोबतच शासनाचा उद्देश सफल होणार असल्याचे सुचवित एकात्मिक बाल विकास विभागाच्या आयुक्तांनी बालवाडीचे वर्ग बंद करून अंगणवाड्यांचे मनपा शाळांमध्ये स्थानांतरण करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले होते.
पुढे काहीच झाले नाही!
शहरातील एकूण १७९ अंगणवाड्या मनपाच्या शाळेत स्थानांतरण करण्यापूर्वी बाल विकास विभाग व मनपाने शाळांची संयुक्तिक पाहणी केली असता मनपाच्या ३३ शाळांपैकी केवळ पाच शाळांमध्ये अंगणवाडीचे वर्ग सुरू करता येणार होते. २०१८ मध्ये ही प्रक्रिया ठप्प पडल्यानंतर पुढे काहीच झाले नाही.
बालवाडी बंद; विद्यार्थी वाऱ्यावर
मनपा शाळेत अंगणवाडी सुरू करण्याच्या लगबगीत मोठ्या उत्साहाने सुरू केलेले बालवाडीचे वर्ग बंद करण्याची वेळ प्रशासनावर ओढवली.
मनपा शाळेत बालवाडीचे वर्ग सुुरू झाल्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे खुली झाली होती. बालवाडी बंद झाल्याने गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी वाºयावर आहेत.