Maratha Reservation: येत्या 15 दिवसांत मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेल- मुख्यमंत्र्यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 04:44 PM2018-11-14T16:44:18+5:302018-11-14T16:46:03+5:30
पुढील पंधरा दिवसात मराठा आरक्षणाचा मुद्दा निकालात निघेल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
अकोला : मराठा आरक्षण मिळाले पाहिजे याबाबत राज्यशासन नेहमीच सकारात्मक राहिले असून मागासवर्ग आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या संदर्भात चित्र स्पष्ट होईल. हा अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत येणे अपेक्षीत होते त्याची पूर्तता झाली असून, पुढील पंधरा दिवसात या अहवालाची वैधानिक कार्यवाही पूर्ण केली जाईल. पुढील पंधरा दिवसात आरक्षणाचा मुद्दा निकालात निघेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
अकोला जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळ व विविध विकासकामांच्या आढावा बैठकीसाठी ते बुधवारी अकोल्यात आले होते. बैठकीनंतर नियोजन भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अद्यापपावेतो सरकारकडे पोहोचलेला नाही. या अहवालाच्या संदर्भात प्रसार माध्यमांमध्ये विविध वृत्ते झळकली आहेत. अहवालात काय शिफारसी असतील याचा अंदाज घेताना अनेकांनी अहवालच हाती लागल्यासारखी मांडणी केली असून, ही केवळ पंतगबाजी आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल फुटलेला नाही असा दावा त्यांनी केला. हा अहवाल शासनाकडे सादर झाल्यानंतर त्यासदंर्भातील वैधानिक कार्यवाही पुर्ण करून तो अहवाल सार्वजनिक करायचा की नाही याबाबत निर्णय घेऊ असे ही ते म्हणाले.