सामाजिक कार्यातून समाजात बदल घडविणे सहज शक्य! - डॉ. रवींद्र कोल्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:05 PM2020-01-11T12:05:49+5:302020-01-11T18:17:26+5:30
डॉ. कोल्हे यांनी रविवारी लोकमत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्याशी साधलेला संवाद...
- नितीन गव्हाळे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पवैद्यकीय शिक्षण घेत असताना, आम्हाला, ग्रामीण भागात सेवा देण्यास सांगण्यात येते. परंतु ८0 टक्के डॉक्टर ग्रामीण भाग सोडून शहरांमध्ये जातात. खरी गरज कोठे आहे. ओळखून मी अति दुर्गम अशा मेळघाटमधील आदिवासींची निरपेक्षपणे सेवा करण्याचे ठरविले. मळघाटमध्ये आरोग्य, शिक्षण, शेतीविषयावर काम करून बदल घडवून आणला. कारण सामाजिक कार्यातून समाजात बदल घडवून आणणे सहज शक्य आहे. त्यासाठी प्रत्येकाने मेळघाटच्या निसर्गरम्य वातावरणात भेट द्यावी. असे प्रसिद्ध समाजसेवी व पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे यांनी सांगितले. डॉ. कोल्हे यांनी रविवारी लोकमत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्याशी साधलेला संवाद...
प्र. - वैद्यकीय शिक्षणानंतर सामाजिक कार्याकडे कसे वळले?
- लहानपणापासून हृदयविकाराचा रूग्ण होता. वडील रेल्वेत होते. त्यामुळे उपचार मिळाले. परंतु गोरगरीब कुटूंबातील अनेक मुले हृदयरोगाने मरण पावत. नागपुरला वैद्यकीय शिक्षण घेत, असताना ा८0 टक्के डॉक्टर शहरात जातात. त्यांची गरज शहरांमध्ये नाहीतर ग्रामीण भागाला आहे. व्हेअर इज नो डॉक्टर हे पुस्तक वाचल्यानंतर मेळघाटमधील बैरागड या दुर्गम भागात आरोग्य सेवेला सुरूवात केली. त्यावेळी अनेकांनी मुर्खात काढले होते.
प्र. - बैरागडला गेल्यावर कुपोषणाची काय परिस्थिती होती?
- खूपच विदारक परिस्थिती होती. त्यावेळी धर्नुवाताचे दीड रूपयांचे इंजेक्शन उपलब्ध न झाल्याने, सहा बालमृत्यू व माता मृत्यू डोळ्यांनी बघितले. त्यामुळे बालमृत्यूवर संशोधन करण्याचे ठरविले. १९९0 पूर्वी कुपोषण हा शब्द कुठेही नव्हता. तो संशोधनातून पुढे आणला. शासनाला दखल घ्यावी लागली. त्यानंतर बरेच बदल झाले. कुपोषणाची समस्या संपली असे नाही. परंतु बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले.
प्र. - एक रूपया फि मध्ये उदरनिर्वाह कसा चालायचा?
- इयत्ता अकरावी, बारावीपर्यंतचे शिक्षण वर्धा येथे घेतले. महात्मा गांधीचे सत्याचे प्रयोग हे पुस्तक वाचले. तेथे आश्रमात स्वावलंबन शिकलो. मेळघाटमधील बैरागड येथे आल्यावर आदिवासी बांधवांचा उपचार करायचो. त्यांच्याकडून केवळ १ रूपया फि घ्यायचो. गरजा अधिक नव्हत्या. ४00 रूपयांमध्ये घर चालविणे. हा उद्देश डोळ्यांसमोर होता. त्यामुळे अडचणी आल्या नाहीत.
प्र. - लग्न जुळविण्यात कशा अडचणी आल्या, त्याविषयी सांगा?
माझ्या लग्नसंबधाचा प्रसंग रंजक आहे. सुरूवातीला संसार करायचाच नाही. असा विचार होता. एमडी करीत असताना, विवाहाचा विचार आला. दुर्गम भागात काम करणाऱ्याला डॉक्टरला कोण मुलगी देईल.?असा प्रश्न होता आणि ४00 रूपयांत संसार, ४0 किमीचा प्रवास, प्रसंगी भिक मागावी लागेल, ५ रूपयात लग्न या माझ््या चार अटी होत्या. वैराग्यमुर्ती गाडगेबाबांचा माझ्यावर प्रभाव आहे. त्यामुळे अनेकींनी लग्नास नकार दिले. एक डॉक्टर मुलगी भेटली. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले आणि तिने भक्कम साथ दिली. ३३ वर्षांचा तिच्या साथीने संसार सुरू आहे.
प्र. - सर्वत्र शेतकरी आत्महत्या होतात, मेळघाटमध्ये एकही आत्महत्या नाही?
मेळघाटची जमिन सुपिक आहे. मोठे जंगल आहे. पाऊस सुद्धा भरपूर होतो. परंतु पावसाचे पाणी जमिनीत मुरायचे नाही. सिंचनाचा अभाव होता. पाणीटंचाईमुळे टँकरने पाणीपुरवठा व्हायचा. सुरूवातीला शेतांमध्ये बांध घातले. पाणी अडविले. शेतातील पाणी शेतातच मुरविण्याची व्यवस्था केली. त्यामुळे पाण्याची पातळी वाढली. वर्षातून एक किंवा दोन पिके घेण्याची पद्धती होती. सिंचनामुळे आता मेळघाटमधील शेतकरी चार, पाच पिके घेतो. शेणखताचा वापर, जैविक शेती येथे केली जाते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. शेतकरी आत्महत्या थांबल्या. शेतकºयांना भरपूर नाही. परंतु पोटापुरता पैसा मिळाला.