अकोल्यातून नवीन रेल्वे गाड्या धावणे अशक्य ; भुसावळ रेल्वे विभागाने दिला अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 01:12 AM2018-01-14T01:12:51+5:302018-01-14T01:14:08+5:30
रेल्वे मार्गाची निश्चित वाहतूक क्षमता संपुष्टात आल्याने अकोल्यातून नवीन रेल्वे गाड्या धावणे अशक्य आहे, असा अहवाल भुसावळ रेल्वे विभागाने दिला आहे. त्यामुळे भविष्यात अकोलेकरांना नवीन रेल्वे गाड्या मिळण्याची शक्यता मावळली आहे.
संजय खांडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
रेल्वे मार्गाची निश्चित वाहतूक क्षमता संपुष्टात आल्याने अकोल्यातून नवीन रेल्वे गाड्या धावणे अशक्य आहे, असा अहवाल भुसावळ रेल्वे विभागाने दिला आहे. त्यामुळे भविष्यात अकोलेकरांना नवीन रेल्वे गाड्या मिळण्याची शक्यता मावळली आहे.
मुंबई-कोलकाता लोहमार्गावरील अकोला रेल्वेस्थानकावरील गाड्यांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी सातत्याने केली जाते. विदर्भातून मुंबईकडे आणि मुंबईतून विदर्भाकडे येणार्यांची प्रवासी संख्या जास्त असल्याने रेल्वे तिकीट आरक्षणाची प्रतीक्षा यादी कायम मोठी असते. सकाळी साडेअकरा वाजता गीतांजली एक्स्प्रेसनंतर आणि सायंकाळच्या ६ वाजताच्या मेलपर्यंत थेट मुंबईकडे जाणारी रेल्वे गाडी अकोल्यातून नाही. पाच-सहा तासांच्या या काळात काही रेल्वे गाड्या अकोला मार्गे वळविल्या तर अकोलेकरांसाठी सुविधा उपलब्ध होईल. अशा आशयाची मागणी अकोल्यातून सातत्याने होत असते. त्यामुळे प्रत्येक रेल्वे बजेटमध्ये अकोलेकरांना रेल्वेगाड्या वाढण्याची अपेक्षा असते. तांत्रिक कारणांमुळे अकोल्यातून रेल्वे गाड्या धावू शकत नाही, ही बाब मात्र अनेकांना ठाऊक नाही. याबाबतचा गोपनीय अहवाल रेल्वे प्रशासनाने पाठविला आहे. क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त रेल्वेगाड्या अकोला रेल्वे ट्रॅकवरून धावताहेत का, अशी विचारणा स्थानक प्रबंधक जी.बी. मीणा यांना केली असता, त्यांनी दुजोरा दिला. मात्र, याबाबत मला काही बोलण्यास नकार दिला.
क्षमता १३0 गाड्यांची धावताहेत १८६.
अकोला रेल्वेस्थानकाच्या ट्रॅकची क्षमता दररोज १३0 गाड्यांची आहे. मात्र, अकोल्याच्या रेल्वे ट्रॅकवरून अप-डाऊन बाजूच्या पकडून दररोज १६0 ते १८६ गाड्या धावतात. दररोजची ही वाहतूक ट्रॅकच्या क्षमतेपेक्षा जास्त झाली आहे. प्रवासी गाड्यापेक्षा कोळसा आणि सिमेंटची वाहतूक करणार्या मालगाड्यांची संख्या या मार्गावर जास्त आहे. त्यामुळे या अकोला ट्रॅकवर ओव्हर लोड होत आहे.
ट्रॅकची क्षमता नसल्याने नवीन रेल्वे गाड्या या मार्गे वाढविता येणार नाही. मुंबईकडे जाणार्या प्रवाशांना थेट अकोल्यातून आरक्षण मिळत नसले, तरी भुसावळहून अनेक रेल्वे गाड्या मुंबईकडे धावणार्या आहेत. दोन टप्प्यात प्रवास केला, तर ही समस्या दूर होऊ शकते.
-वसंत बाछुका, रेल्वे समिती सदस्य.