‘तो’ प्रकाश नागमणीचा नव्हे तर चायनामेड बॅटरीचा !
By admin | Published: February 22, 2017 02:28 AM2017-02-22T02:28:00+5:302017-02-22T02:28:00+5:30
महसूल, पोलीस यंत्रणेने उलगडले रहस्य
देऊळगावराजा, दि. २१- तालुक्यातील सावखेड भोई येथे विहिरीमधून रात्रीच्या वेळेस पडणार्या प्रकाशाचा छडा पोलीसांनी लावला असून तो प्रकाश चायनामेड बॅटरीचा असल्याचे तपासात समोर आले आहे. यामुळे परिसरात गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या कथित नागमणीच्या प्रकाशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
सावखेड भोई येथील एकनाथ वाघमारे यांच्या विहीरीमधून गेल्या आठ दिवसापासून रात्रीच्या वेळी प्रकाश पडत होता. हा प्रकाश ह्यनागमणीह्णचा असल्याची अफवा परिसरात पसरली. यानंतर हा प्रकार पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत होती. पोलीस व महसूल यंत्रणेने या प्रकाराची गंभीर दखल घेतली. प्रभारी तहसीलदार मदन जाधव, ठाणेदार विजयसिंग राजपूत यांनी घटनास्थळी भेट देऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले होते. तसेच भुवैज्ञानिकांनाही लेखी माहिती दिली होती. तथापि, भुवैज्ञानिक सावखेड भोईकडे फिरकलेच नाही.
विहिरीतून पडणार्या या प्रकाशाचे रहस्य उलगडण्यासाठी सोमवारी विहिरीतील पाणी उपसण्याचा निर्णय घेण्यात आला, परंतु विद्युतपुरवठा नसल्याने पाणी उपसता आले नाही. मंगळवारी सकाळी विहिरीतील सर्व पाण्याचा उपसा करण्यात आला. त्यावेळी विहीरीमध्ये कुणीतरी कॅरीबॅगमध्ये दगड टाकून चायनामेड बॅटरी सुरु करुन टाकल्याचे आढळले. यामुळे कथित नागमणीच्या प्रकाशाची ती अफवा ठरली.
रात्री विहीरीतून प्रकाश बाहेर पडत असल्याची अफवा
देऊळगावराजा शहरालगतच्या सावखेड भोई या गावात प्रवेश करण्याच्या मार्गावर एकनाथ वाघमारे व त्यांच्या भावंडाची सामायिक विहीर आहे. या विहिरीत रात्रीच्यावेळी प्रकाश पडत असल्याचे काही ग्रामस्थांच्या लक्षात आले. यानंतर हा प्रकार परिसरात सर्वांना माहीत झाला. विहीरीत नाग -नागिन असून त्यांचाच हा प्रकाश असल्याची अफवाही काही जणांनी पसरवली होती.
पोलीस घेताहेत 'रँचो'चा शोध !
काही वर्षापूर्वी एका हिंदी चित्रपटात आमिरखानने साकारलेली रँचोची भूमिका खूप गाजली होती. हा रँचो अफलातून प्रयोग करण्यात तरबेज होता. याच धर्तीवर विहीरीत कॅरीबॅगमध्ये दगड टाकून चायनामेड बॅटरी सुरु करुन पडणार्या प्रकाशाने ग्रामस्थांमध्ये उत्सुकता, सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्या सावखेड भोईच्या ह्यरँचोह्ण चा पोलीस शोध घेत आहेत.