२४ तासांत लागतो २० टनपेक्षा जास्त ऑक्सिजन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:22 AM2021-04-30T04:22:51+5:302021-04-30T04:22:51+5:30
जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घालण्यास सुरुवात केली. मार्च महिन्यात दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढली, तर एप्रिल महिन्यात ...
जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घालण्यास सुरुवात केली. मार्च महिन्यात दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढली, तर एप्रिल महिन्यात कोरोनाची ही लाट अधिक घातक ठरली. वयोवृद्धांसह तरुणांमध्येही गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढले. त्यामुळे मार्च महिन्याच्या तुलनेत सुमारे ४० टक्क्यांनी ऑक्सिजनची मागणी वाढली. सर्वोपचार रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन खाटा मिळत नसल्याने रुग्णांची एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात वणवण सुरू आहे. सद्य:स्थितीत सर्वोपचार रुग्णालयाला १० टन, तर सर्व खासगी रुग्णालये मिळून १० टन, असे एकूण २० टन ऑक्सिजन २४ तासांत लागते. जिल्ह्यात अशी परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली आहे. गतवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेतही ऑक्सिजनची एवढी मागणी झाली नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ही स्थिती अशीच कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
..अशी आहे ऑक्सिजनची गरज
रुग्णालय - आता - पूर्वी
सर्वोपचार रुग्णालय - १० टन - ७ टन
खासगी रुग्णालये - १० टन - ५ टन
का वाढली ऑक्सिजनची मागणी?
कोविडच्या गंभीर रुग्णांची संख्या वाढली
शरीरात ऑक्सिजनची मात्र कमी असल्याने रुग्णांना कृत्रिमरीत्या ऑक्सिजन द्यावा लागत आहे.
जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या गंभीर रुग्णांची संख्या वाढली.
तरुणांनाही लागतोय ऑक्सिजन
कोरोनाच्या पहिल्या लाटेत केवळ कोमॉर्बिट किंवा ६० वर्षांवरील व्यक्तींनाच ऑक्सिजनची गरज भासायची, मात्र दुसऱ्या लाटेत तरुणांमध्येही ऑक्सिजनची मात्रा कमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. गंभीर रुग्णांमध्ये तरुणांचे प्रमाण जास्त असल्याने चिंता वाढली आहे.