आयटीआय प्रवेशाची टक्केवारी वाढली; विद्यार्थी वळताहेत आयटीआयकडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 02:33 PM2018-07-07T14:33:13+5:302018-07-07T14:37:44+5:30
अकोला: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आयटीआय अभ्यासक्रम रोजगाराभिमुख असल्याने, त्याकडे विद्यार्थ्यांचा कल दरवर्षी वाढत आहे.
अकोला: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आयटीआय अभ्यासक्रम रोजगाराभिमुख असल्याने, त्याकडे विद्यार्थ्यांचा कल दरवर्षी वाढत आहे. आयटीआयमधील सर्वच शाखांमधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी स्वतंत्र व्यवसायासोबतच खासगी कंपनी, महावितरण कंपनीमध्ये नोकरी करीत आहेत. एकंदरीतच दरवर्षी आयटीआयला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. गतवर्षीच्या तुलनेत अडीच हजार विद्यार्थ्यांनी ही संख्या वाढली आहे.
काही वर्षांपूर्वी आयटीआय प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली होती. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना अवकळा प्राप्त झाली होती; परंतु अलिकडच्या दोन वर्षांमध्ये आयटीआयला पुन्हा चांगले दिवस आले आहेत. खासगी कंपन्यासुद्धा अभियांत्रिकीची पदवी घेणाºया विद्यार्थ्यांपेक्षा आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्याला कमी वेतनात नोकरी देतात. मुंबई, पुणे येथील कंपन्यांमध्ये १५ ते २0 रुपये वेतनामध्ये शेकडो आयटीआय विद्यार्थ्यांना नोकºया मिळत आहेत. केंद्र शासनानेसुद्धा मेक इन इंडिया, स्कील इंडियासारखे उपक्रम सुरू करून कौशल्य शिक्षणाला प्रोत्साहन दिले आहेत. एवढेच नाही तर केंद्र व राज्य शासनाने कौशल्य विकास मंत्रालय सुरू केले आहे. कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा. विद्यार्थ्यांनी नोकरीसोबतच स्वतंत्र व्यवसाय उभारावा. हा उद्देश आहे. औद्योगिक प्रशिक्षणातून खासगी कंपन्यांसह महावितरण, एमआयडीसीमधील कारखान्यांमध्ये रोजगार मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात या अभ्यासक्रमाकडे ओढा वाढत आहे. त्यामुळेच शासनानेसुद्धा आयटीआयच्या विविध शाखांमधील प्रवेश क्षमता १ लाख ३७ हजार ६१0 पर्यंत वाढविली आहे. राज्य शासनाने कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय सुरू करून कुशल महाराष्ट्र...रोजगार युक्त महाराष्ट्र हे घोषवाक्यसुद्धा दिले आहे. यानुसार आयटीआयतील मुला-मुलींसाठी भरती रोजगार मेळाव्यांचे आयोजन करून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. (प्रतिनिधी)
मुला-मुलींसाठी असलेले अभ्यासक्रम
इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, कॉम्प्यूटर आॅपरेटर, टर्नर, मोटार मॅकेनिक, वायरमन, पेंटर(जनरल) आणि मुलींसाठी सेक्रेटेरियल प्रक्टीस(इंग्रजी), ड्रेसमेकींग, बेसिक कॉसमॅटोलॉजी, बेकर कन्फेक्शनर, फ्रुटस् अॅण्ड व्हिजिटेबल प्रोसेसिंग, कॉम्प्युटर आॅपरेटर अॅण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट, इंटेरियर डेकोरेशन अॅण्ड डिझाईन, फॅशन डिझाईन अॅण्ड टेक्नॉलॉजी, इन्फॉरमेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टम, मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स आदी शाखा उपलब्ध आहेत.
शासनाने कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्रचे ध्येय समोर ठेवून युवक, युवतींना कौशल्य प्रशिक्षणाद्वारे सक्षम बनवून त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या उद्देशाने संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. आयटीआयमधील कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे युवक, युवतींचा ओढा आयटीआयकडे वाढला आहे.
- प्रमोद भंडारे, प्राचार्य, आयटीआय, मुलींची.