गणेशोत्सवात ‘बेटी बचाओ’ चा जागर; गणेश मंडळांसाठी देखावा स्पर्धा
By Atul.jaiswal | Published: September 9, 2018 03:32 PM2018-09-09T15:32:51+5:302018-09-09T15:39:14+5:30
आगामी गणेशोत्सवादरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ चा जागर होणार आहे.
अकोला : मुलींचा जन्मदर वाढविण्याच्या दृष्टीने जनजागृती व्हावी, या उद्देशााने आगामी गणेशोत्सवादरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ चा जागर होणार आहे. यासाठी देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल यांनी दिली.
महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणरायाचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या गणेशोत्सवादरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातर्फे ‘पीसीपीएनडीटी’ कार्यक्रमाअंतर्गत ‘बेटी बचाओ - बेटी पढाओ’ या विषयावर गणेश मंडळांकरीता देखावा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी मंडळांच्या देखाव्यांची पाहणी जिल्हा सल्लागार समितीमधील सदस्य करतील. यामध्ये तीन सर्वोत्कृष्ट देखाव्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांनी १२ सप्टेंबरपर्यंत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय येथे संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. आरती कुलवाल यांनी केले आहे.