अकोला जिल्ह्यात 'जननी-२' चा जागर; महिला सुरक्षेच्या कार्यक्रमांचे शतक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:09 PM2018-07-18T13:09:05+5:302018-07-18T13:11:01+5:30
अकोला: जिल्ह्यातील महिला, मुली व युवतींच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या संकल्पनेतून १२ ते २२ जुलैदरम्यान सुरू करण्यात आलेल्या जननी-२ चा जिल्हाभर प्रचंड जागर सुरू आहे.
- सचिन राऊत
अकोला: जिल्ह्यातील महिला, मुली व युवतींच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या संकल्पनेतून १२ ते २२ जुलैदरम्यान सुरू करण्यात आलेल्या जननी-२ चा जिल्हाभर प्रचंड जागर सुरू आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणेदार व पोलीस अधिकाऱ्यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी व जनजागृतीसाठी रोजच कार्यक्रम आयोजित केल्याने केवळ सहा दिवसांतच कार्यक्रमांचे शतक झाले आहे. यामध्ये शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थिर्नींसह महिला संघटनांनीही स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन जनजागृती सुरू केली आहे.
महिलांवर चार भिंतीच्या बाहेर होणारे अत्याचार गंभीर विषय असला, तरी चार भिंतीच्या आतमध्ये म्हणजेच कौटुंबिक कलहामध्ये होणाºया अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी चार भिंतीच्या आत होणारे अत्याचार रोखण्यासाठी महिलांची जागृती व्हावी, लहान मुलींनी गुड-टच बॅड-टच कळावा, अत्याचाराला वेळीच वाचा फोडण्यासाठी महिलांमध्ये शक्ती निर्माण करावी म्हणून जननी हा उपक्रम सुरू केला होता. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनीही महिलांवरील अत्याचाराचा पूर्णपणे सखोल अभ्यास केल्यानंतर जननी उपक्रमाची आवश्यकता असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी १२ ते २२ जुलै या कालावधीत याच उपक्रमाचा दुसरा टप्पा मोठ्या जोमात सुरू केला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर जननी-२ उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याने सध्या जिल्हाभर जननी-२ चा जागर असल्याचे दिसून येत आहे. यासाठी पोलीस अधीक्षक कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने विविध कार्यक्रम आयोजित करून मार्गदर्शन करीत आहेत.
५० हजारांवर महिलांना मार्गदर्शन
जननी-२ या उप्रक्रमांतर्गत केवळ सहा दिवसांत कार्यक्रमांचे शतक गाठण्यात आले आहे, तर शाळा-महाविद्यालये, महिला संघटनांच्या माध्यमातून आतापर्यंत अकोला पोलिसांनी तब्बल ५० हजारांवर युवती, महिला व मुलींना सुरक्षेविषयी व जनजागृतीसाठी मार्गदर्शन केले आहे. महाविद्यालयांमध्ये अधिक कार्यक्रम घेण्यात आले असून, मीडिया व्हॅनद्वारेही ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येत आहे.
शाळा-महाविद्यालयांत तक्रारपेट्या
अकोला पोलिसांनी मुलींच्या सुरक्षिततेसाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये तक्रारपेट्या लावलेल्या आहेत. एखाद्या मुलीची छेडखानी किंवा तिला रस्त्यावर कुणी काही टॉन्टिंग करीत असेल, तर तिने या तक्रारपेटीत तक्रार करावी, ही तक्रारपेटी दर आठवड्यात उघडण्यात येणार असल्याची माहिती आहे. मुलीचे नाव गोपनीय ठेवून कारवाई करण्यात येणार आहे.