भारतीय लष्कराचे जय भारत हॉट एअर बलून येणार अकोल्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:28 PM2018-12-01T12:28:27+5:302018-12-01T12:28:36+5:30
एकात्मतेचे प्रतीक असलेल्या दोन ‘हॉट एअर बलून’चे शनिवार, १ डिसेंबर रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर आगमन होणार आहे.
अकोला : भारतीय लष्कराचे साहसी कौशल्य बघण्याची संधी अकोेलेकरांना उपलब्ध होणार असून, एकात्मतेचे प्रतीक असलेल्या दोन ‘हॉट एअर बलून’चे शनिवार, १ डिसेंबर रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर आगमन होणार आहे. यासाठीची जय्यत तयारी कृषी विद्यापीठाने केली आहे.
देशांतर्गत युवा वर्गाला भारतीय लष्कराच्या जवानांचे साहसी कौशल्य करण्यासाठी भारतीय सेनेच्या साहसी बटालियनद्वारे उत्तर-दक्षिण भारत दौरा निश्चित केला असून, राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या साहसी अभियानाची सुरुवात झाली आहे. जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जवळपास ३,२३६ किमी अंतराचा साहसी प्रवास दोन हॉट एअर बलूनद्वारे पूर्ण करून भारतीय एकात्मतेचे दर्शन यानिमित्ताने घडणार आहे. जम्मू येथील झोरावर स्टेडियम येथून दिमाखदार सोहळ्याद्वारे सुरू झालेली ही मोहीम देशभरातील जवळपास ३१ स्थानकांवर थांबा घेत आपल्या हवेतील साहसाने लक्षवेधी ठरत आहे. या मोहिमेचे शनिवार, १ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर आगमन होणार आहे.
२ डिसेंबर रोजी सकाळ अकोलेकरांसाठी खऱ्या अर्थाने कुतूहलाची ठरणार असून, भारतीय लष्कराच्या साहसी जय भारत मोहिमेचे हॉट एअर बलूनद्वारे अकोला येथून नांदेडकडे प्रयाण होईल. कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणातून हॉट एअर बलून सोबतच इतर बलूनद्वारे साहसी जवान हवाई मार्गाने रवाना होणार आहेत. लेफ्ट. कर्नल विवेक तेहलावत, भोपाळ यांच्यासह सुभेदार राजेश कुमार, जबलपूर यांच्या नेतृत्वात बलून पुढील सफरीसाठी निघणार आहेत.
याप्रसंगी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, ११ महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे कमांडिंग आॅफिसर कर्नल सी. एलवर्सन यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. वेळेवर सुरू होणाºया या नयनरम्य सोहळ्याला शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांचे एनसीसी कॅडेट्स, कृषी विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत. अकोला शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेच्या या उपक्रमाला उपस्थित राहून भारतीय सैन्यदलाबद्दल अधिक जाणून घ्यावे, क्रीडांगणावर होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक व्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्वांनी सहयोग करण्याचे आवाहन कृषी विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.