जेल अधीक्षक हल्लाप्रकरणी अजय गालटला शिक्षा
By admin | Published: August 6, 2015 01:14 AM2015-08-06T01:14:03+5:302015-08-06T01:14:03+5:30
पाच वर्षांंचा सश्रम कारावास व दंड.
अकोला: मध्यवर्ती कारागृहाच्या तत्कालीन अधीक्षिका स्वाती साठे यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी करणारा आरोपी अजय गालट याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनी मंगळवारी कठोर शिक्षा सुनावली. गालटला विविध गुन्हय़ांमध्ये पाच वर्षांंचा सश्रम कारावास व ६0 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास आणखी दोन वर्ष, सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
अकोल्यातील यादव नावकार खून खटल्यातील शिक्षा झालेला आरोपी अजय रघुराम गालट हा कारागृहात असताना त्याने २२ डिसेंबर २000 रोजी सायंकाळी ६ वाजता मध्यवर्ती कारागृहाच्या तत्कालीन अधीक्षिका स्वाती साठे यांच्यावर हल्ला केला होता. यावेळी साठे यांच्या सोबत असलेल्या पोलीस कर्मचार्यांनी गालटला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंंत त्याने साठे यांना मारहाण केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.
यासोबतच काही पोलीस कर्मचारीही या मारहाणीत जखमी झाले होते. त्यानंतर या प्रकरणी स्वाती साठे यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अजय गालटविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३, ३३२ नुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास करून सिटी कोतवाली पोलिसांनी २९ जुलै २00१ रोजी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. मात्र प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने २६ जुलै २00२ रोजी अजय गालटची निर्दोष मुक्तता केली होती.