देशी कट्टा व जिवंत काडतुसासह आरोपी जेरबंद
By admin | Published: March 9, 2016 02:06 AM2016-03-09T02:06:54+5:302016-03-09T02:06:54+5:30
वाशिम एलसीबीची कारवाई; रिव्हॉल्वर व पाच जिवंत काडतुसे जप्त.
वाशिम : जिवंत काडतुसासह देशी कट्टा बाळगणार्या आकाश सुरेश कांबळे (रा. पंचशील नगर, वाशिम) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. ही घटना ८ मार्च रोजी सकाळी ११:३0 वाजताच्या सुमारास घडली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डी. बी. तडवी यांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराच्या आधारे पंचशील नगर परिसरात असलेल्या एका ढाब्याजवळ युवक जिवंत काडतुसासह देशी कट्टा बाळगत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलीसांनी धाब्याजवळ सापळा रचला.
या सापळ्यामध्ये आकाश कांबळे याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याचे कमरेला खोचलेली रिव्हॉल्वर व पाच जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी कांबळे याच्याकडून रिव्हॉल्वर व काडतुसासह एक मोटारसायकल जप्त केली. जप्त केलेल्या एकूण मालाची किंमत ७२ हजार ५00 एवढी आहे.
आकाश कांबळे याच्याविरुद्ध आर्म अँक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. रिव्हॉल्वर कांबळे याने कुणाजवळून खरेदी केली, याचा तपास केल्यास वाशिम पोलिसांच्या हाती मोठे रॅकेट लागू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.