श्री राजराजेश्वराचा आज जलाभिषेक, लोकोत्सवासाठी अकोला नगरी सज्ज; लाखो कावडधारक शहरात दाखल
By किरण अग्रवाल | Published: September 11, 2023 09:20 AM2023-09-11T09:20:25+5:302023-09-11T09:37:25+5:30
अकोलेकरांनी रस्त्यांवर तोरण बांधून व भव्य रांगोळ्या काढून कावडधारकांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.
अकोला - येथील लोकोत्सव ठरलेल्या व महाराष्ट्रातील एकमात्र अशा कावड महोत्सवासाठी अकोला नगरी सज्ज झाली असून, गांधीग्राम येथील हरिहरेश्वर येथून पवित्र जल घेऊन 'जय भोले'चा गजर करीत लाखो कावडधारी अकोला शहरात दाखल झाले आहेत.
श्रावणातील अखेरच्या म्हणजे चौथ्या सोमवारी १८ किलोमीटरवर असलेल्या हरिहरेश्वर येथील पवित्र जल कावड मध्ये घेऊन पायी चालत येत अकोल्याचे ग्रामदैवत श्री राजेश्वराला जलाभिषेक करण्याची कावड धारकांची ७९ वर्षांची प्रथा आहे. गणेशोत्सवाप्रमाणे भोले शंकराच्या उंचच उंच मूर्ती तसेच अन्य देव देवतांच्या प्रतिमा व देखाव्यांसह मिरवणुकीने ढोल ताशांच्या गजरासह येत व जय भोले, बम बम भोले, हर बोला महादेवचा गजर करीत लाखो शिवभक्त व्यक्तिगत तसेच विविध सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून या कावड उत्सवात सहभागी होत असतात.
यंदा सुमारे १४० पेक्षा अधिक सार्वजनिक कावडधारक मंडळांची नोंदणी झाली असून मानाच्या श्री राजराजेश्वर पालखीसह अन्य पालख्या व कावडधारक अकोला शहराच्या प्रवेशद्वारावर अकोट फाईल पर्यंत दाखल झाले आहेत. अकोट फाईल येथे अकोलेकरांच्या वतीने विधिवत पूजन व आरती होऊन कावडधारक शहरात दाखल होतील. अकोलेकरांनी रस्त्यांवर तोरण बांधून व भव्य रांगोळ्या काढून कावडधारकांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. चौका चौकांमध्ये विविध सामाजिक मंडळे व राजकीय पक्षांतर्फे भव्य व्यासपीठ उभारून कावडधारकांच्या स्वागताची सज्जता करण्यात आली आहे. अनेक सामाजिक संस्थांनी कावडधारकांच्या जलपानाची, चहा व महाप्रसादाची व्यवस्था केली आहे. जिल्हा भरातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यातून लाखो शिवभक्त कावड उत्सव बघण्यासाठी आपल्या कुटुंबीयांसह अकोला शहरात दाखल झाले असून, अकोला बसस्थानक व रेल्वे स्थानकावरून भक्तांचा ओघ शहरात दाखल होत आहे. सर्वत्र हर बोला महादेवचा गजर ऐकू येत आहे.
अकोला - येथील लोकोत्सव ठरलेल्या व महाराष्ट्रातील एकमात्र अशा कावड महोत्सवासाठी अकोला नगरी सज्ज झाली असून, गांधीग्राम येथील हरिहरेश्वर येथून पवित्र जल घेऊन 'जय भोले'चा गजर करीत लाखो कावडधारी अकोला शहरात दाखल झाले आहेत. pic.twitter.com/8ift9k4ERK
— Lokmat (@lokmat) September 11, 2023
दाेन हजारांवर पाेलिसांचा बंदाेबस्त, ड्रोन, सीसी कॅमेऱ्यांची नजर
राजराजेश्वराच्या कावड-पालखी उत्सवासाठी पोलिस प्रशासना कडून दोन हजारांवर पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले असून, ड्रोन, सीसी कॅमेरे, श्वान पथक तैनात करण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांची पालखी-कावड मार्गावर करडी नजर आहे. २५० पेक्षा अधिक कर्मचारी इतर जिल्ह्यातून बंदोबस्तासाठी बोलाविण्यात आले आहेत. महत्त्वाच्या ठिकाणी जसे, गांधीग्राम, अकोट फैल व राजेश्वर मंदिर परिसरात आरसीपीचे पथक राहणार आहे. एसआरपीचे एक युनिट व ८०० होमगार्डही बंदोबस्तात आहेत. मद्यप्राशन किंवा इतर नशा करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांचे एक खास पथक तैनात आहे
प्रत्येक चौकात सीसी कॉमेरे!
श्रावणातील चौथ्या सोमवारी मोठ्या प्रमाणावर आयोजित कावड यात्रा व पालखी मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी चौकाचौकात सीसी कॅमेरे, स्वच्छ पाणी, पूर्णा नदी पुलावरील चोख व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. कावड, पालखी उत्सव निमित्त अकोला शहरामध्ये व मिरवणूक मार्गाकरिता उपविभागीय दंडाधिकारी डॉ.शरद जावळे यांना इन्सिडंट कमांडर म्हणून नेमण्यात आले आहे.