जळगाव जामोद -ब-हाणपुर आंतरराज्य मार्ग सुरू होणार

By admin | Published: August 13, 2015 10:43 PM2015-08-13T22:43:20+5:302015-08-15T01:36:46+5:30

डिसेंबरअखेरपर्यंत काम पूर्णत्वास; मध्यप्रदेश बांधकाम विभागाची माहिती.

The Jalgaon Jamod-Bah-Hanpur Inter State Road will be started | जळगाव जामोद -ब-हाणपुर आंतरराज्य मार्ग सुरू होणार

जळगाव जामोद -ब-हाणपुर आंतरराज्य मार्ग सुरू होणार

Next

नानासाहेब कांडलकर/ जळगाव जामोद (बुलडाणा): महाराष्ट्रातून मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूर, खंडवा, इंदोर, उज्जैनकडे जाण्यासाठी सुमारे ४0 कि.मी.चे अंतर कमी करणारा जळगाव जामोद ते बर्‍हाणपूर या आंतरराज्य मार्गाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे. हा मार्ग डिसेंबर २0१५ अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती मध्यप्रदेश बांधकाम विभागाने लोकमतला दिली आहे. जळगाव जामोद ते बर्‍हाणपूर हे अंतर ५९ कि.मी. आहे. त्यापैकी महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंतचे अंतर १६ कि.मी. तर मध्यप्रदेश हद्दीतील रस्ता ४३ कि.मी. आहे. त्यापैकी सुमारे ८ कि.मी. रस्ता हा सातपुडा पर्वतातील आहे. बर्‍हाणपूरपासून ३0 कि.मी. रस्त्याचे डांबरीकरण झाले असून, तेरा-चौदा कि.मी. रस्ता तयार होणे बाकी होता. त्यापैकी ९ कि.मी. रस्त्याचे खडीकरण, रूंदीकरण व डांबरीकरण पूर्ण झाले असून शेवटचा व अतिमहत्वाचा सातपुडा पर्वतातील पाच कि.मी. लांबीचा रस्ता तयार होणे बाकी आहे. या रस्त्याच्या कामाला पावसाळ्यानंतर सुरूवात होवून डिसेंबरअखेरपर्यंंत डांबरीकरणासह हा रस्ता तयार करण्यात येईल, अशी माहिती मध्यप्रदेश सार्वजनिक विभागाचे अभियंता चौधरी यांनी दिली. हा आंतरराज्य मार्ग सुरू झाल्यास बर्‍हाणपूर, खंडवा, इंदोर, व उज्जैनकडे जाण्याचे अंतर सुमारे ४0 कि.मी. ने कमी होणार आहे. सध्या नागपुर, अमरावती, अकोला, अकोट, शेगाववरून जी वाहने मलकापूर, मुक्ताईनगर मार्गे मध्यप्रदेशाकडे जातात, ती सर्व वाहने जळगाव जामोदवरून मध्यप्रदेशातील या महत्वाच्या शहराकडे जातील. यामुळे सध्या आडवळणावर असणारे जळगाव जामोद शहर आंतरराज्य मार्गावर येणार आहे. मध्यप्रदेशच्या हद्दीतील या रस्त्याचे काम होत असताना, महाराष्ट्राच्या हद्दीतील सातपुडा पर्वतातील सुमारे तीन कि.मी. रस्त्याचे रूंदीकरण करण्याची गरज आहे. त्याकरीता महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

*शेगावचे अंतर होणार कमी

        श्री संत गजानन महाराजांचा मोठा भाविक वर्ग मध्यप्रदेशात आहे. खंडव्यावरून बर्‍हाणपूर, जळगाव जामोद मार्गे अनेक भक्त शेगावची पायीवारी करतात. हा रस्ता डिसेंबरपर्यंत सुरू झाल्यास गजानन भक्तांची शेगाव येथे येण्याची सोय होईल. त्यामुळे हा रस्ता त्वरीत सुरू होणे जेवढे महाराष्ट्रासाठी आवश्यक आहे., तेवढाच तो मध्यप्रदेशसाठीसुध्दा महत्वाचा आहे.

Web Title: The Jalgaon Jamod-Bah-Hanpur Inter State Road will be started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.