विकास कामांत जळगाव पालिका अमरावती विभागात प्रथम
By admin | Published: October 15, 2016 02:55 AM2016-10-15T02:55:38+5:302016-10-15T02:55:38+5:30
मुंबई येथील नगर परिषद मुख्याधिका-यांची बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून कौतुकाची थाप.
जळगाव जामोद, दि. १४- विकासकामांचे सुव्यवस्थित नियोजन, निधीचा योग्य ठिकाणी वापर, विकासकामांची जलदगती व उत्तम दर्जा तसेच सर्वाधिक निधीची विकासकामे या कारणांमुळे जळगाव जामोद नगर परिषद ही अमरावती विभागात प्रथम क्रमांकाची ठरली आहे. गुरुवार, १३ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांनी सर्व नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांची बैठक आयोजित केली होती.
नगर परिषदेत गत दोन वर्षांंंंत सुमारे ३२ कोटींची कामे झाली आहेत. काही कामे पूर्ण झाली असून, काही कामे प्रगतिपथावर आहेत. नगराध्यक्ष रामदास बोंबटकार यांना आ. डॉ. संजय कुटे यांची पूर्ण साथ मिळाल्याने राज्य सरकारकडून मोठा निधी खेचून आणला.नगरात दुर्गा चौकाचे सौंदर्यीकरण, तीन बगिचांची उभारणी, तीन शॉपिंग कॉम्प्लेक्सची उभारणी, स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांंंंंना अभ्यासिकेची उभारणी, व चौकाचौकांत हायमास्ट लाइट, नगराचा सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी सांस्कृतिक भवन आदी कामे अत्यंत वेगाने केली.
या बाबी ठरल्या उपयुक्त
निधी या वर्षातच खर्ची घालणे, यापूर्वी प्राप्त झालेला निधी अखर्चिक नसणे, सर्व योजनांतर्गत उपलब्ध निधीचा त्या-त्या योजनांसाठीच उपयोग करणे, या सर्व बाबी जळगाव नगर परिषदेला क्रमांक एकवर नेण्यास कारणीभूत ठरल्या आहेत. निधी खेचून आणण्यासाठी आ. डॉ. संजय कुटे यांनी प्रयत्न केले, तर नगराध्यक्ष रामदास बोंबटकार व मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांनी याबाबत घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळाले आहे.