रोहनखेड येथे २५ वर्षांपासून जलकुंभ कोरडा ठण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:19 AM2021-05-26T04:19:11+5:302021-05-26T04:19:11+5:30
रोहनखेड : ग्रामस्थांना पाणी उपलब्ध व्हावे. यासाठी जीवन प्राधिकरण विभागाने रोहनखेड येथे लाखो रुपये खर्च करून जलकुंभ बांधण्यात ...
रोहनखेड : ग्रामस्थांना पाणी उपलब्ध व्हावे. यासाठी जीवन प्राधिकरण विभागाने रोहनखेड येथे लाखो रुपये खर्च करून जलकुंभ बांधण्यात आला. मात्र या जलकुंभात पाणीच चढत नसल्याने हा जलकुंभ शोभेची वस्तू ठरला आहे. परिणामी या जलकुंभासाठी खर्च करण्यात आलेला पैसाही पाण्यात गेला.
८४ खेडी पाणीपुरवठा योजनेंतर्गत युती शासनाच्या काळात हा जलकुंभ उभारण्यात आला. वन प्रकल्पाच्या जलसाठ्याचा विचार करून सुरू करण्यात आलेल्या या योजनेचे काम गत पंचवीस वर्षांपासून रखडले असून बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या टाक्या अर्धवट स्थितीत उभ्या आहेत. रोहनखेड येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने १९९६ मध्ये जलकुंभ बांधण्यात आला. गत जलकुंभ बांधून पंचवीस वर्षे पूर्ण झाले. मात्र या गावातील जलकुंभात पाणी आले नाही. टाकीच्या बांधकामात लाखाेच्यावर पैसा खर्च झाला. परंतु पैसा खर्च होऊनही जलकुंभ अद्यापही तहानलेलेच आहे.
रोहनखेड येथे भीषण पाणीटंचाई
सध्याच्या स्थितीत उन्हाळ्याचे दिवस असल्याने रोहनखेड येथे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावाला आठवड्यातून एकदा पाणी मिळते. काही भागात पाणी मिळते तर गौतम नगर भागात पंधरा दिवस पाणी मिळत नाही. ग्रामस्थांना भर उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
पाण्यासाठी रात्रभर जागरण
ग्रामस्थ पाण्यासाठी रात्रभर जागरण करतात. अशी बिकट परिस्थिती आहे. जलकुंभात पाणी आले असते तर भर उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला नसता. जलकुंभात पाणी चढविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. अशी मागणी होत आहे.