जालना-छपरा एक्स्प्रेस मनमाड मार्गे; पूर्णा-अकोला ब्रॉडगेजच्या पदरी उपेक्षाच
By Atul.jaiswal | Published: November 2, 2022 03:08 PM2022-11-02T15:08:23+5:302022-11-02T15:09:18+5:30
परभणी-पूर्णा-हिंगोली-वाशिम-अकोला मार्गे प्रस्तावित असलेली जालना-छपरा ही साप्ताहिक विशेष गाडी अखेर जालना-औरंगाबाद-मनमाड मार्गे छपराकडे वळविण्यात आली आहे.
अतुल जयस्वाल
अकोला: परभणी-पूर्णा-हिंगोली-वाशिम-अकोला मार्गे प्रस्तावित असलेली जालना-छपरा ही साप्ताहिक विशेष गाडी अखेर जालना-औरंगाबाद-मनमाड मार्गे छपराकडे वळविण्यात आली आहे. यामुळे ब्रॉडगेज होऊन अनेक वर्षे उलटून गेल्यानंतरही मोजक्याच गाड्या सुरू असलेल्या पूर्णा-अकोला मार्गाच्या पदरी पुन्हा एकदा उपेक्षाच आली आहे, तर दुसरीकडे उत्तर भारतात जाण्यासाठी थेट रेल्वेची मागणी करणाऱ्या अकोला, वाशिम व हिंगोली जिल्ह्यांतील प्रवासी संघटनांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
जालना-छपरा या साप्ताहिक विशेष गाडीला २६ ऑक्टोबर रोजी रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली. ही गाडी जालना, परभणी, पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला मार्गे जाणार होती, असे दानवे यांनी या कार्यक्रमात स्वतःच सांगितले. मनमाड-भुसावळ मार्गे उत्तर भारतात जाणाऱ्या अनेक गाड्या अगोदरच धावत असताना जालना-छपरा ही गाडी परभणी-पूर्णा-अकोला मार्गे जावी, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून होत होती. परंतु, औरंगाबाद येथील बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांना सोयीचे व्हावे, यासाठी ही गाडी औरंगाबाद-मनमाड मार्गे वळविण्यात आल्याचे बोलले जात आहे.
यामुळे केवळ औरंगाबाद जिल्ह्याचा फायदा झाला असला, तरी परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला या जिल्ह्यातील प्रवाशांना मात्र त्याचा फटका बसला आहे. या जिल्ह्यांमध्ये उत्तर भारतीय नागरिकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. या भागातील प्रवाशांना मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व बिहारकडे जायचे असल्यास भुसावळ, खंडवा किंवा नागपूर येथून रेल्वे पकडावी लागते. या प्रवाशांसाठी जालना-छपरा ही रेल्वे खूप सोयीची होणार होती. परंतु, या रेल्वेचा मार्ग रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बदलल्यामुळे या जिल्ह्यातील जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"