‘जलयुक्त शिवार’ची ७९१ कामे रेंगाळली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 02:51 PM2018-09-28T14:51:37+5:302018-09-28T14:53:51+5:30
अकोला : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यात गत दोन वर्षात कामांच्या नियोजनातील ७९१ कामे अद्याप प्रलंबित आहेत.
- संतोष येलकर
अकोला : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यात गत दोन वर्षात कामांच्या नियोजनातील ७९१ कामे अद्याप प्रलंबित आहेत. संबंधित यंत्रणांच्या दिरंगाईत रेंगाळलेली ‘जलयुक्त शिवार‘ची कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्यात वारंवार उद्भवणाऱ्या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी गत चार वर्षांपासून शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २०१६-१७ या वर्षात जिल्ह्यात २ हजार १७८ कामांचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी २ हजार १५७ कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित २१ कामे अद्याप प्रलंबित आहेत. तसेच सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यात २ हजार ६०८ कामांचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी १ हजार ८३८ कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित ७७० कामे अद्याप रखडली आहेत. निधी उपलब्ध असताना, संबंधित यंत्रणांच्या दिरंगाईत गत दोन वर्षांपासून जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’ची ७९१ कामे रेंगाळली आहेत. त्यामुळे गत दोन वर्षात जिल्ह्यातील रेंगाळलेली ‘जलयुक्त शिवार’ची कामे संबंधित यंत्रणांकडून केव्हा पूर्ण करण्यात येणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.
दोन वर्षात रेंगाळलेली अशी आहेत कामे !
वर्ष कामे
२०१६-१७ २१
२०१७-१८ ७७०
.......................................
एकूण ७९१