‘जलयुक्त शिवार’ कामांचा बोजवारा; जिल्ह्यात केवळ ६०६ कामे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:57 PM2019-02-27T12:57:07+5:302019-02-27T12:57:13+5:30
अकोला : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या १४४ गावांमध्ये १ हजार ९२० कामे प्रस्तावित करण्यात आली असली तरी, त्यापैकी २६ फेबु्रवारीपर्यंत केवळ ६०६ कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
- संतोष येलकर
अकोला : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या १४४ गावांमध्ये १ हजार ९२० कामे प्रस्तावित करण्यात आली असली तरी, त्यापैकी २६ फेबु्रवारीपर्यंत केवळ ६०६ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’ च्या कामांचा बोजवारा उडाला असून, उर्वरित कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्यात वारंवार उद्भवणाऱ्या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील १४४ गावांची निवड करण्यात आली. या गावांमध्ये ‘जलयुक्त शिवार’ची १ हजार ९२० कामे प्रस्तावित करण्यात आली. त्यापैकी २६ फेबु्रवारीपर्यंत केवळ ६०६ कामे पूर्ण करण्यात आली असून, ४५८ कामे सुरू आहेत. उर्वरित कामे करण्यास तीन महिन्यांचा कालावधी उरला असून, लवकरच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरित कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’च्या कामांचा बोजवारा उडाल्याची बाब समोर येत आहे.
‘जलयुक्त’ची पूर्ण करण्यात आलेली अशी आहेत कामे !
तालुका कामे
अकोला ५४
अकोट ९३
बाळापूर ५६
बार्शीटाकळी २६२
तेल्हारा ०९
पातूर ८७
मूर्तिजापूर ४५
.........................................
एकूण ६०६
१३१४ कामे प्रलंबित !
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये प्रस्तावित कामांपैकी ६०६ कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित १ हजार ३१४ कामे प्रलंबित आहेत. प्रलंबित असलेली जलयुक्त शिवारची कामे संबंधित यंत्रणांकडून केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.
मंजूर निधी ३५ कोटी; खर्च केवळ ५ कोटी !
जिल्ह्यातील ‘जलयुक्त शिवार’ च्या कामांसाठी ३५ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी शासनामार्फत मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी जिल्ह्यात आतापर्यंत पूर्ण करण्यात आलेल्या ६०६ कामांवर केवळ ५ कोटी १७ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला असून, उर्वरित ३० कोटी रुपयांचा निधी खर्च केव्हा होणार आणि कामे केव्हा मार्गी लागणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.