जामद-यात खरिपाची पेरणी नाहीच!
By admin | Published: June 15, 2016 01:57 AM2016-06-15T01:57:31+5:302016-06-15T01:57:31+5:30
शेतकरी ठाम असून अस्मानी, सुलतानी संकटांचा वैताग व्यक्त होत आहे.
नाना देवळे/ मंगरुळपीर (जि. वाशिम)
मागील तीन वर्षांंपासून दुष्काळी परिस्थितीमुळे झालेली नापिकी तसेच वन्य प्राण्यांचा हैदोस आणि शेती समस्यांकडे होत असलेले प्रशासनाचे दुर्लक्ष आदी अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे मंगरुळपीर तालुक्यातील जामदर्याचे शेतकरी पार वैतागले आहेत. यामुळेच त्यांनी २२ फेब्रुवारीला खरिपाच्या पेरणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयावर ते शेतकरी अद्यापही ठाम आहेत.
उत्पादन खर्च आणि नफ्याचा ताळमेळ बसविणे कठीण झाले आहे. जगाचा पोशिंदा असला तरी स्वत:च्या कुटुंबाचेही पोट भरणे शक्य नाही. त्यामुळे तोट्याचा व्यवसाय ठरत असलेली करायची नाही म्हणून खरीप हंगामात पेरणीवर बहिष्काराचा निर्णय घेतला जात आहे. जिल्ह्यात आता गावांमागे गावे यात सहभागी होऊ लागली आहेत. शेतीच झाली नाही, तर खायचे काय, याचा विचार सरकारने या संकटाच्या सुरुवातीलाच करायला हवा. शेतकर्यांजवळील कच्चा माल कवडीमोल दरात खरेदी केला जातो; पण हाच माल व्यापार्यांच्या गोदामात पोहोचल्यावर त्याचे दाम दुप्पट आणि तो पक्का होताच त्याची किंमत चौपट वाढते. अशा परिस्थितीत शेतकरी कसा सुखी होणार? शेतकरी आत्महत्यांचे खापर दुष्काळावर फोडून सरकार जबाबदारी झटकत आहे. सरकारचे शेतीविरोधी धोरण आणि त्यातून निर्माण झालेली विवंचना सर्वांंसमोर मांडण्यासाठीच जामदरा येथील शेतकर्यांनी २२ फेब्रुवारी रोजी खरीप पेरणीवर बहिष्काराचा निर्णय घेतला आणि ते अद्यापही आपल्या निर्णयावर ठाम आहेत. प्रत्यक्षात जामदराच्या शेतकर्यांनी हा निर्णय घेतल्यानंतर शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर याची दखल घेऊन, शेतकर्यांशी आपुलकीने संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न होणे आवश्यक होते; परंतु याची दखल घेण्यात आली नाही. जिल्ह्यातील राजकीय नेते अथवा लोकप्रतिनिधींनी या शेतकर्यांच्या समस्या जाणूनच घेतल्या नाही. मुळात शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून वाशिमची ओळख आहे. त्यामुळे येथील शेतीचे प्रश्न अधिक गांभीर्याने हाताळण्याची गरज असतानाही त्याची दखल घेतली जात नसल्याने शेतकर्यांच्या समस्या अधिक बिकट होत चालली आहे