‘कोरोना’ शृंखला तोडण्यासाठी ‘लॉकडाऊन’; पश्चिम विदर्भात १०० बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 05:31 PM2020-03-22T17:31:31+5:302020-03-22T17:33:17+5:30
एखाद्या आवाहनास प्रतिसाद देत १०० टक्के बंद पाळण्याची ही १९९० च्या दशकानंतरची पहिलीच घटना म्हणावी लागेल.
अकोला: कोरोना विषाणूचा कम्युनल स्प्रेड रोखण्याच्या (सामाजिक प्रसार) दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी स्वत:ला स्वयंस्फूर्तपणे घरातच ‘लॉकडाऊन’ करून घेतले. स्वयंस्फूर्तपणे एखाद्या आवाहनास प्रतिसाद देत १०० टक्के बंद पाळण्याची ही १९९० च्या दशकानंतरची पहिलीच घटना म्हणावी लागेल.
कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी शासनाने केलेल्या आव्हानाला अकोल्याची जनता, व्यापारी, उद्योजक, सर्वच प्रतिष्ठानांचे संचालक, आॅटो, वाहन चालकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शहरातील रस्त्यावर सकाळी अकोला शहर, जिल्ह्यातील रस्त्यांवर शुकशकाट होता. अकोल्यात भाजीपाला, अन्नधान्य या जीवनावश्यक वस्तूंची विक्रीही बंद होती. पेट्रोलपंप मात्र सुरू होती; ‘शृंखला पायी असू दे, मी गीत गतीचे गायीन’ ही कविता एक अर्थबोध देणारी असली तरी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अर्थात कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी एक प्रकारे बुलडाणेकरांनी त्यांच्या गतिमान जीवनास ब्रेक लावल्याचे चित्र सकाळीच ७ वाजतापासून बुलडाणा जिल्ह्यात दृष्टिपथास आले. वाशिम जिल्ह्यात २२ मार्च रोजी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वसाहती, बाजार, मुख्य चौक, सार्वजनिक स्थळे निर्जन होतीच, शिवाय जिल्हाभरातील मार्गावरही शुकशुकाट दिसून आला. यादरम्यान, सर्वच मुख्य मार्गासह शहरांमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. रेल्वे स्टेशन, बसस्थानक, पेट्रोल पंप, बाजारपेठ आदी ठिकाणे ओस पडल्याचे दिसून आले. काही खासगी दवाखाने आणि मेडिकलचा अपवाद वगळता अन्य दवाखाने व मेडिकलही बंद होते.