जानेवारीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 01:37 AM2017-12-21T01:37:29+5:302017-12-21T01:37:52+5:30
अकोला : शिवसंपर्क अभियानच्या माध्यमातून राज्यात पक्ष बांधणीसाठी सरसावलेले शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ जानेवारी महिन्यात धडाडणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शिवसंपर्क अभियानच्या माध्यमातून राज्यात पक्ष बांधणीसाठी सरसावलेले शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ जानेवारी महिन्यात धडाडणार आहे. जिल्ह्यातील शेतकर्यांसोबत संवाद साधण्यासोबतच उद्धव ठाकरे यांच्या दोन जाहीर सभा होणार आहेत. पक्षप्रमुख ठाकरे यांचा अकोला जिल्ह्याकडे वाढलेला कल पाहता ऐन थंडीच्या दिवसांत जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
शिवसंपर्क अभियानच्या माध्यमातून पक्षाची मजबूत बांधणी करणार्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मे महिन्यात विधानसभा मतदारसंघनिहाय शेतकर्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. उद्धव ठाकरे यांनी १५ मे रोजी पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यातील पदाधिकार्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला होता. २0१४ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने युती तुटली, त्याची सल अद्यापही शिवसैनिकांच्या मनात आहे. त्यामुळेच सत्तेत सहभागी असूनही पहिल्या दिवसांपासून शिवसेनेने भाजपावर टीका किंवा विरोध करण्याची एकही संधी सोडल्याचे दिसत नाही. अर्थातच, २0१९ मध्ये पार पडणारी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याच्या उद्देशातून शिवसेनेने चारही बाजूने मजबूत तटबंदी निर्माण करण्यासाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. १0 जानेवारी रोजी पुन्हा एकदा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे जिल्ह्यात आगमन होत असून, जाहीर सभांच्या माध्यमातून त्यांची तोफ धडाडणार आहे.
दोन सभा आणि शेतकर्यांशी संवाद
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे १0 जानेवारीला सकाळी १0 वाजता आगमन होईल. ११.३0 वाजता लाखपुरी येथे शेतकर्यांसोबत संवाद साधतील. दुपारी २ वाजता अकोट येथे सभा, ४ वाजता उरळ येथे शेतकर्यांसोबत संवाद साधतील. सायंकाळी जुने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सभा; रात्री मुक्काम केल्यानंतर ११ जानेवारी रोजी सकाळी वाशिमकडे प्रयाण करणार असल्याची माहिती आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १५ मे रोजी शिवसंपर्क अभियानच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकर्यांसोबत संवाद साधला होता. त्यानंतर महिनाभरात पक्षप्रमुखांनी तीन वेळा अकोला जिल्ह्याचा दौरा केला. आता सहा महिन्यांनी पुन्हा पक्षप्रमुखांचे आगमन होत आहे. जिल्ह्यात शिवसेना सक्रिय होण्यासोबतच संघटना मजबूत झाल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे.
-नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख शिवसेना