जरांगे पाटील यांनी आंदोलनासोबतच राजकीय भूमिका घ्यावी; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सल्ला
By संतोष येलकर | Published: January 19, 2024 07:59 PM2024-01-19T19:59:30+5:302024-01-19T20:00:02+5:30
लोकसभा निवडणुकीत उतरले पाहिजे
अकोला : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलनासोबतच राजकीय भूमिका घेऊन, आगामी लोकसभा निवडणुकीत उतरले पाहिजे, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे दिला.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ओबीसींच्या आरक्षणाचे ताट वेगळे आणि गरीब मराठा प्रवर्गाला वेगळे आरक्षण असावे, अशी आम्ही भूमिका घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे-पाटील यांना झुलवण्याचे काम सरकारकडून सुरू असल्याचे जरांगे यांनी लक्षात घेतले पाहिजे, असे सांगत लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे सरकारचा हात दगडाखाली असून, गरीब मराठ्यांना आरक्षण मिळू नये, असे सत्तेतील श्रीमंत मराठ्यांना वाटते, असा आरोपही ॲड. आंबेडकर यांनी केला. गरीब मराठ्यांचा आरक्षणाचा लढा गत ३५ वर्षांपासून सुरू आहे; परंतु जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वातील आंदोलनाच्या निमित्ताने या लढ्याला स्वरूप आले, आकार आला, मागणी पुढे आली असून समाजात सहानुभूती असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे गरीब मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलनासोबतच जरांगे पाटील यांनी राजकीय भूमिका घेतली पाहिजे, असे आंबेडकर म्हणाले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता अढाऊ, बालमुकुंद भिरड, गजानन गवइ, विकास सदांशिव, विकास सदांशिव, मजर अली आदी उपस्थित होते.
गरीब मराठ्यांचा आवाज, लोकसभेत गेला पाहिजे
गरीब मराठ्यांचा आवाज लोकसभेत गेला पाहिजे, यासाठी जरांगे-पाटील योग्य भूमिका घेतील, गांभीर्याने विचार करतील, अशी अपेक्षाही ॲड. आंबेडकर यांनी व्यक्त केली. जरांगे-पाटील यांच्या निमित्ताने गरीब मराठ्यातील नेतृत्व उभे राहिले असून, गरीब मराठ्यांनी त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहण्याचे आवाहन करीत, जरांगे-पाटील यांनी जी ताकद निर्माण केली आहे, त्याआधारे ते संसदेत पाेहोचू शकतात आणि तेथे गेल्यानंतर प्रश्नाचा निकाल लावता येतो, असेही आंबेडकर यांनी सांगितले.
आघाडीसंदर्भात आम्ही शेवटपर्यंत वाट पाहू !
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘इंडिया’ आघाडीतील वंचित बहुजन आघाडीच्या समावेशाच्या संदर्भात काँग्रेसने योग्य भूमिका घेतली पाहिजे, या संदर्भातील निर्णयाबाबत आम्ही शेवटपर्यंत वाट पाहू, असेही ॲड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले.