जसनागरा पब्लिक स्कूलमधील चोरी प्रकरणाचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:14 AM2021-06-05T04:14:40+5:302021-06-05T04:14:40+5:30
अकोला : रिधोरा येथील जसनागरा पब्लिक स्कूलमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी करीत दुचाकी, एलईडी टीव्ही, संगणक व मुद्देमाल पळविला ...
अकोला : रिधोरा येथील जसनागरा पब्लिक स्कूलमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी करीत दुचाकी, एलईडी टीव्ही, संगणक व मुद्देमाल पळविला होता. या प्रकरणातील दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जसनागरा पब्लिक स्कूल येथे काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. या चोरी प्रकरणी पब्लिक स्कूलमध्ये कार्यरत असलेले शुभम उमेश दुबे यांनी बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास बाळापूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने समांतररित्या सुरू केला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांना मिळालेल्या माहितीवरून या प्रकरणातील आरोपी आदेश विनायक जाधव वय २२ वर्ष व भीमराव उर्फ भीमा गौतम सुखदाने वय २० वर्ष दोघेही राहणार दधम तालुका बाळापूर यांना ताब्यात घेतले. या दोन्ही चोरट्यांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून लपवून ठेवलेली दुचाकी, एलईडी टीव्ही, संगणक, मोबाईल, कीबोर्ड, डेल कंपनीचा ॲडप्टर, यासह विविध इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे. या चोरट्यांना पुढील तपासासाठी बाळापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, जयंत सोनटक्के, अश्विनी मिश्रा, शक्ती कांबळे, किशोर सोनवणे, शेख वसीम, रोशन पटले, सतीश गुप्ता, सुशील खंडारे, चालक अक्षय बोबडे यांनी केली.