जावेद इनामदारच्या राज्यातील संपत्तीचा शोध
By Admin | Published: October 24, 2015 01:42 AM2015-10-24T01:42:02+5:302015-10-24T01:42:02+5:30
तहसील व नोंदणी कार्यालयांना दिले पत्र, मोठे घबाड येणार उघडकीस.
सचिन राऊत / अकोला: अकोला जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनामदार याची राज्यात अनेक ठिकाणी संपत्ती असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे (एसीबी) प्राप्त झाली आहे. या माहितीच्या आधारे अकोला एसीबीने राज्यातील तहसील कार्यालय व दुय्यम उपनिबंधक कार्यालयांना पत्र पाठवून इनामदारच्या संपत्तीची माहिती मागविली आहे. तेल्हारा पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या दोन कर्मचार्यांच्या गृह कर्जाच्या प्रकरणाला अंतिम मंजुरी देण्यासाठी जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शमशोद्दीन इनामदार याने २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. यामधील १५ हजार रुपयांची लाच त्याने आधीच स्वीकारली, तर उर्वरित १0 हजार रुपयांची लाच घेत असताना त्याला अकोला एसीबीने १९ ऑक्टोबर रोजी रंगेहाथ अटक केली होती. त्यानंतर सांगली लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने त्याच्या घराची झडती घेऊन १ कोटी १६ लाख रुपयांची संपत्ती जप्त केली. अकोला एसीबीनेही त्याच्या अकोल्यातील निवासस्थानावरून काही आक्षेपार्ह दस्तऐवज व जिल्हा परिषदेतील कक्षातून ४९ हजार ६६९ हजार रुपये जप्त केले. त्यानंतर इनामदारने त्याच्या संपत्तीची माहिती देण्यासाठी अकोला एसीबीने नियमानुसार माहिती मागितली. मात्र, इनामदार काहीही माहिती देत नसल्याने अकोला एसीबीने संपत्तीची नोंदणी होत असलेल्या राज्यातील तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालयांना पत्र पाठवून जावेद शमशोद्दीन इनामदार याच्या संपत्तीची माहिती मागविली आहे. इनामदारच्या मोठय़ा संपत्तीचा यामध्ये पर्दाफाश होणार असल्याचा विश्वास अकोला एसीबीला असून, त्यासाठी त्यांनी प्रत्येक तांत्रिक बाबीवर लक्ष केंद्रित करून तपास सुरू केला आहे. तहसील कार्यालय व दुय्यम निबंधक कार्यालयांकडून माहिती मिळताच ही संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.