वाशिम जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन नगण्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 03:41 PM2018-11-14T15:41:46+5:302018-11-14T15:43:53+5:30
ज्वारीच्या उत्पादनाचे प्रमाण अगदीच नगण्य असून वाशिम वगळता अन्य एकाही बाजार समितीत ज्वारीची आवकच होत नसल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबिन आणि रब्बी हंगामात हरभरा या पिकांचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. त्यातुलनेत अल्प दर मिळत असल्याने ज्वारीच्या उत्पादनाचे प्रमाण अगदीच नगण्य असून वाशिम वगळता अन्य एकाही बाजार समितीत ज्वारीची आवकच होत नसल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात कधीकाळी कापूस आणि ज्वारी ही पिकांचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जायचे. मात्र, तुलनेने मोठी बाजारपेठ उपलब्ध न होणे, अपेक्षित दर न मिळणे, विविध स्वरूपातील कीडरोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शन न मिळणे आदी कारणांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये या दोन्हीही प्रमुख पिकांचे उत्पादन प्रचंड प्रमाणात घटले आहे. त्याजागी खरीप हंगामात आता सोयाबिनचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जात असून त्यापाठोपाठ तूर, मुग, उडिद ही पिके घेतली जातात; तर रब्बी हंगामात गहू आणि हरभरा या पिकांच्या उत्पादनाचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातुलनेत ज्वारीची लागवड झाल्याचे अभावानेच पाहावयास मिळत आहे.
सद्य:स्थितीत जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा आणि मालेगाव या सहा प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी एकमात्र वाशिमच्या बाजार समितीत ज्वारीची नित्यनेम आवक होत आहे. असे असले तरी त्याचे प्रमाण दैनंदिन ५ ते १० क्विंटलपेक्षा अधिक नाही. सद्या ज्वारीला वाशिमच्या बाजार समितीमध्ये ९५० ते ११३० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. एवढ्या अल्प दरात ज्वारी विकावी लागत असल्याने शेतकºयांनी उत्पादनाकडेच दुर्लक्ष केल्याने हे पीक जिल्ह्यातून बहुतांशी हद्दपार होण्याच्या मार्गाप्रत पोहचले आहे.