जावयाने नमस्कार केला नाही, म्हणून थेट पोलिसांत तक्रार!
By admin | Published: February 10, 2016 02:19 AM2016-02-10T02:19:04+5:302016-02-10T02:19:04+5:30
सास-याने दिली तक्रार, चौकशीनंतर तक्रार खोटी असल्याचे आले समोर.
अकोला: जावयाच्या घरी गेल्यानंतर जावाईबापू नमस्कार करीत नाहीत; आदरातिथ्य करीत नसल्याच्या कारणावरून सासरेबुवांनी थेट खदान पोलीस ठाण्यात तक्रार केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. सासर्याने खोटी तक्रार केल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. त्याचे झाले असे की, खदान परिसरात राहणार्या एका इसमाची मुलगी परभणी येथे दिलेली आहे. दीड वर्षांंपूर्वीच परभणी येथील युवकासोबत मुलीचे रीतीरिवाजानुसार लग्न झाले. लग्न झाल्यानंतर सासरेबुवा परभणीला जावयाकडे जायचे; परंतु जावई फारसा काही बोलत नव्हता. सासरेबुवांना जावयाने आपल्याला विचारावे, आदर-सत्कार करावा, असे मनोमन वाटायचे. तथापि, जावई कामामध्ये मग्न असल्याने त्याला मानपान देणे शक्य व्हायचे नाही. यामुळे सासरेबुवांचा गैरसमज झाला. जावई आपल्यासोबत बोलत नाही, आपल्याला विचारत नाही, एवढेच काय साधा नमस्कारसुद्धा करीत नाही. त्यामुळे सासरेबुवांनी जावयाची चांगलीच खोडमोड करायचे ठरविले. काही दिवसांसाठी त्यांची मुलगी आपल्या महिन्याच्या चिमुकल्या मुलीसह परभणीहून अकोल्याला माहेरी आली. काही दिवसांनी त्यांना भेटायला जावईबापूदेखील अकोल्यात आले. सासरेबुवांकडे गेले. एक दिवस राहिल्यानंतर ते परभणीला परत जाण्याच्या तयारीत होते. दरम्यान सासरेबुवांनी खदान पोलीस ठाणे गाठून जावई आपल्या नऊ महिन्याच्या नातीला बळजबरीने परभणीला घेऊन गेल्याची तक्रार खदान पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनीही गंभीर प्रकार असल्याने तक्रारीची नोंद घेतली आणि तातडीने कामाला लागले. जावई व नातीचा शोध पोलीस बस स्टँड, रेल्वे स्टेशन परिसरात घेऊ लागले. दरम्यान, जावईबापू आणि मुलगी सासरवाडीतच असल्याचे पोलिसांना कळले. पोलिसांनी सर्वांंना ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. प्रत्येकाची वेगवेगळी चौकशी केली.