गावे पाणीदार करण्यासाठी जे.सी.बी. व पोकलॅन्ड धारकांनी योगदान द्यावे - जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 05:28 PM2018-05-10T17:28:18+5:302018-05-10T17:28:18+5:30

जास्तीतजास्त कामे होण्यासाठी जिल्हयातील जे.सी.बी. व पोकलॅन्ड धारकांनी त्यांच्याकडील मशिन तातडीने उपलब्ध करुन दयावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले.

JCB owener should give Contributions for water conservation works - District Collector | गावे पाणीदार करण्यासाठी जे.सी.बी. व पोकलॅन्ड धारकांनी योगदान द्यावे - जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

गावे पाणीदार करण्यासाठी जे.सी.बी. व पोकलॅन्ड धारकांनी योगदान द्यावे - जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी यांच्या दालनात आज जिल्हयातील जे.सी.बी. व पोकलॅन्ड धारकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. 22 मे पर्यंत सर्व कामे करणे आवश्यक असल्याने अधिकचे जे.सी.बी. व पोकलॅन्डची आवश्यकता आहे. या मशिनचे भाडे भारतीय जैन संघटना देणार असून डिझेलचा खर्च प्रशासनाकडून दिला जाणार आहे.

अकोला:  पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाणी फाउंडेशनमार्फत जिल्हयात जलसंधारणाची कामे सुरु आहेत. मात्र आता या कामांसाठी केवळ तेरा दिवस शिल्लक असून कमी कालावधीत जास्तीतजास्त कामे होण्यासाठी जिल्हयातील जे.सी.बी. व पोकलॅन्ड धारकांनी त्यांच्याकडील मशिन तातडीने उपलब्ध करुन दयावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले.

जिल्हाधिकारी यांच्या दालनात आज जिल्हयातील जे.सी.बी. व पोकलॅन्ड धारकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी भारतीय जैन संघटनेचे सुभाष गादीया, अमरीशजी पारख, पाणी फाउंडेशनचे नरेंद्र काकड, जिल्हा खनिकर्म अधिकारी दौड, पातुरचे तहसिलदार रामेश्वर पुरी आदींसह पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक आणि जे.सी.बी. व पोकलॅन्ड धारक  उपस्थित होते.

  जिल्हयातील  अकोट, तेल्हारा, बार्शिटाकळी व पातूर तालुक्यातील पाणी फाउंडेशन अंतर्गत सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत भाग घेतलेल्या गावांपैकी 68 गावांत जलसंधारणाचे मोठया प्रमाणात कामे सुरु आहेत. या कामांसाठी भारतीय संघटनेने 70 मशिन उपलब्ध करुन दिल्या आहेत. मात्र अदयाप जलसंधारणची अनेक मोठी कामे करणे शिल्लक आहेत. 22 मे पर्यंत सर्व कामे करणे आवश्यक असल्याने अधिकचे जे.सी.बी. व पोकलॅन्डची आवश्यकता आहे.  त्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सदर बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी जे.सी.बी. व पोकलॅन्ड धारकांना मशिन उपलब्ध करुन देण्याची सूचना केली.

पाणी फाउंडेशनमार्फत श्रमदानातून जलसंधारणाची अनेक छोटी कामे घेण्यात आली आहेत.  नाला खोलीकरण, मातीनाला बांध, शेततळे या  कामांसाठी  भारतीय जैन संघटनेने 70 मशिनही उपलब्ध करुन दिल्या आहेत. दरम्यान गावे पाणीदार करण्यासाठी जिल्हयातील जे.सी.बी. व पोकलॅन्ड धारकांनीदेखील आपल्याकडील मशिन उपलब्ध करुन देण्याचे आवाहन करताना जिल्हाधिकारी म्हणाले की, गावे पाणीटंचाईतून मुक्त करण्याकरीता ही एक मोठी संधी आहे, सामाजिक दायित्वाच्या भावनेतून तात्काळ मशिन उपलब्ध करुन दयावेत. या मशिनचे भाडे भारतीय जैन संघटना देणार असून डिझेलचा खर्च प्रशासनाकडून दिला जाणार आहे. कामांसाठी कमी कालावधी शिल्लक राहिला असल्याने जे.सी.बी. व पोकलॅन्ड धारकांनी तातडीने मशिन दयावेत. या कामांसाठी त्यांनी भारतीय जैन संघटनेशी समन्वय साधून कामांच्या जागेची निवड करुन तात्काळ कामे सुरु करावीत. कुठलीही अडचण आल्यास आपल्याशी थेट संपर्क साधण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

Web Title: JCB owener should give Contributions for water conservation works - District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.