अधिसेविकेच्या लॉकरमधून दागिने जप्त?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 01:51 AM2017-09-08T01:51:38+5:302017-09-08T01:51:47+5:30
सार्वजनिक आरोग्य खात्यामधून सेवानवृत्त झालेल्या अकोल्यातील एका अधिसेविकेने ११ वर्षांच्या कालावधीत तब्बल पावणेतीन कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता बेकायदेशीररीत्या गोळा केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर एसीबीने अधिसेविका मीना मनोहर माहुरे, तिचा पती मनोहर रामभाऊ माहुरे व मुलगा स्वप्निल मनोहर माहुरे या तिघांच्या बँक लॉकरची तपासणी केली असता, त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात दागिने आढळल्याची माहिती समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सार्वजनिक आरोग्य खात्यामधून सेवानवृत्त झालेल्या अकोल्यातील एका अधिसेविकेने ११ वर्षांच्या कालावधीत तब्बल पावणेतीन कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता बेकायदेशीररीत्या गोळा केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर एसीबीने अधिसेविका मीना मनोहर माहुरे, तिचा पती मनोहर रामभाऊ माहुरे व मुलगा स्वप्निल मनोहर माहुरे या तिघांच्या बँक लॉकरची तपासणी केली असता, त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात दागिने आढळल्याची माहिती समोर आली आहे.
सार्वजनिक आरोग्य खात्यामध्ये वर्ग ३ कर्मचारी असलेली अधिसेविका मीना मनोहर माहुरे हिने तिच्या सेवाकाळातील १ जानेवारी २00२ ते ३0 जून २0१३ या ११ वर्षांच्या कालावधीत तब्बल २ कोटी ७0 लाख 0५ हजार ७१८ रुपयांची अपसंपदा गोळा केली. (ही अपसंपदा मिळकतीपेक्षा ४२0.७७ टक्के एवढी अधिक आहे.) या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे झाल्यानंतर, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमुख संजय गोर्ले यांनी सखोल चौकशी करून गीतानगर येथील रहिवासी सेवानवृत्त अधिसेविका मीना मनोहर माहुरे (वय ६१), तिचा पती मनोहर रामभाऊ माहुरे (वय ६५) व मुलगा स्वप्निल मनोहर माहुरे (वय २८) या तिघांविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी बुधवारी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर एसीबीच्या अधिकारी व कर्मचार्यांनी बँक खाते, लॉकर सील करून त्याची तपासणी सुरू केली असता बँक लॉकरमध्ये दागिने आढळल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तर ही तपासणी सुरूच राहणार असून, मीना माहुरे, पती व मुलगा या तिघांच्या नावे असलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेची अधिकाधिक माहिती घेण्यात येत आहे.