कार्यमुक्त केलेल्या ११ कंत्राटी नर्सेसच्या नोकऱ्या कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:25 AM2021-09-10T04:25:29+5:302021-09-10T04:25:29+5:30
राज्यातील बिगर आदिवासी क्षेत्रांमध्ये नर्सिंग कार्यक्रमासाठी केंद्र शासनाकडे प्रस्तावित करण्यात आलेल्या ५९७ पदांना मंजुरी व वेतन न मिळाल्याने ...
राज्यातील बिगर आदिवासी क्षेत्रांमध्ये नर्सिंग कार्यक्रमासाठी केंद्र शासनाकडे प्रस्तावित करण्यात आलेल्या ५९७ पदांना मंजुरी व वेतन न मिळाल्याने ३१ ऑगस्टपूर्वी ही पदे रद्द करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला होता. कोरोना काळात सेवा देणाऱ्या नर्सेसना आता गरज संपल्यानंतर कार्यमुक्त केल्यामुळे राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आरोग्य कर्मचाऱ्यामध्ये याबाबत निर्माण झालेला रोष व काेरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता आरोग्य विभागाने हा निर्णय रद्द केला आहे.
अभियान संचालकांनी ९ सप्टेंबर रोजी पाठविलेल्या पत्रात या नर्सेसना पुन्हा सामावून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या नर्सेस राष्ट्रीय शहर आरोग्य अभियान, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम किंवा आदिवासी भागात जाण्यास तयार असतील, त्यांना सदर पदावर वर्ग करावे व कोविड रुग्णसंख्या वाढल्यास त्यांच्या सेवा घ्याव्या, तसेच ज्या नर्सेस नवीन पदावर जाण्यास इच्छुक नसतील त्यांना जिल्हा परिषदेच्या नियमित पदभरती पर्यंत त्याच पदावर ठेवण्यात यावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या नर्सेसना कार्यमुक्त केले आहे व त्या नवीन पदावर जाण्यास तयार नसतील तर त्यांना मुळ पदावर रुजू करून घ्यावे, असेही या पत्रात म्हटले आहे.
या नर्सेसना केले होते कार्यमुक्त
उपकेंद्र नर्सचे नाव
नेर कांचन कांबळे
भिली रेश्मा वानखडे
भटोरी वर्षा भूजबळ
निंबी अर्चना भगत
अनभोरा प्रीती गवई
हिवरा कोरडे रुपाली चारथळ
झोडगा एस. डी. माहुलीकर
कुटासा वर्षा किरडे
तिवसा एम. बी. डुकरे
तांदळी बु. दीपाली वानखडे