अतिरिक्त शिक्षकांना रुजू करा; शाळांना आदेश!
By admin | Published: November 7, 2016 02:49 AM2016-11-07T02:49:50+5:302016-11-07T02:49:50+5:30
शिक्षकांचे वेतन मूळ शाळेतून करण्याचेही आदेश नाहीत.
अकोला, दि. ६- जिल्हय़ात अतिरिक्त ठरलेले ५९ शिक्षकांपैकी २0 ते २५ शिक्षकच शाळांवर रुजू झाले. उर्वरित शिक्षकांना मात्र खासगी शाळा रुजू करून घेण्यास नकार देत असल्याने, शिक्षकांची पंचाईत झाली आहे. नोकरी करावी तर कुठे करावी, पगार कोठून निघणार, आदी प्रश्न अतिरिक्त शिक्षकांना भेडसावू लागले आहेत. त्यासाठी शिक्षक माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात चकरा मारत आहेत; परंतु अतिरिक्त शिक्षकांना रुजू करून घेण्याबाबतचे आदेश खासगी शाळांना देण्यात शिक्षण विभाग उदासीन दिसून येत आहे. एवढेच नाही, तर अतिरिक्त शिक्षकांचे वेतन मूळ शाळेतून करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत; परंतु अकोल्यात मात्र तसे कोणतेही आदेश देण्यात आले नसल्याने, शिक्षक विवंचनेत आहेत.
दोन महिन्यांपूर्वी माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्हय़ातील खासगी शाळांमधील रिक्त पदे व अतिरिक्त शिक्षकांची माहिती मागविली. त्यानुसार जिल्हय़ात १0७ रिक्त जागा असल्याची माहिती समोर आली आणि खासगी शाळांमध्ये ११७ शिक्षक अतिरिक्त ठरल्याची माहिती आली.
यामध्ये अनेक शाळांनी जाणीवपूर्वक अतिरिक्त ठरविल्याची ओरडही शिक्षकांनी केली; परंतु अतिरिक्त शिक्षकांची यादी तयार झाल्यानंतर शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात आली. दरम्यान, अतिरिक्त शिक्षकांना त्यांच्या प्रसंतीक्रमानुसार शाळा निवडण्यास सांगण्यात आले. शिक्षकांनी ऑनलाइन पद्धतीने शाळांची निवड केली.
अतिरिक्त शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळांनी कार्यमुक्त केल्यानंतर शिक्षण विभागाने शिक्षकांना रिक्त पदे असलेल्या खासगी शाळांवर रुजू होण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हय़ात आतापर्यंत २0 ते २५ शिक्षक शाळांमध्ये रुजू झाले. उर्वरित अतिरिक्त शिक्षक शाळांमध्ये रुजू होण्यास गेले असता, त्या शाळांनी त्यांना रुजू करून घेण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे अतिरिक्त शिक्षक विचारात पडले.
आता काम कुठे करावे, कोणत्या शाळेवर रुजू व्हावे, असे प्रश्न शिक्षकांना पडले. रिक्त पदे असलेल्या शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांना सामावून घ्यावे, यासाठी शिक्षक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे सातत्याने जाऊन विनवण्या करीत आहेत; परंतु रिक्त पदे असलेल्या शाळांना आदेश देण्यामध्ये शिक्षणाधिकारी कार्यालय उदासीन दिसून येत आहे.
शाळा रुजू करून घेण्यास नकार देत असल्याने, आमचा पगार कोठून निघेल, अशी समस्या निर्माण झाली. त्यावर यवतमाळ, बुलडाणा व अमरावती येथील शाळांमध्ये रुजू न झालेल्या अतिरिक्त शिक्षकांचे वेतन मूळ शाळेतून करण्याचे आदेश तेथील उपसंचालकांनी दिले आहेत; मात्र शिक्षणाधिकार्यांनी असे कोणतेही आदेश दिले नसल्यामुळे अतिरिक्त शिक्षक संभ्रमात आहेत.